Join us

वेडेचाळे कशासाठी? ज्येष्ठ कलाकारांच्या रील्सवर निळू फुलेंची लेक भडकली, 'जर कामं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 9:37 AM

आता गार्गीचा रोख नक्की कुणाकडे आहे हे मात्र तिने नाव न घेता लिहिले आहे.

सध्या मोबाईल सुरु केला की जिकडे तिकडे रील्सचाच भडिमार असतो. आजकाल अनेक जण हे रील्सच्या आहारी गेले आहेत. मनोरंजनापुरतं ठीक आहे पण आता त्याची सवयच होऊ लागली आहे. रील्स करणारे आणि पाहणारे असे लोक सध्या दिसून येत आहेत. दरम्यान काही सिनिअर मराठी कलाकारांचे रील्स पाहून त्यांना वयाचा विसर पडला असल्याची टीका दिवंगत अभिनेते निळू फुले यांची लेक गार्गी फुलेने (Gargi Phule) केली आहे. आता गार्गीचा रोख नक्की कुणाकडे आहे हे मात्र तिने नाव न घेता लिहिले आहे.

एखादा सण असो किंवा ट्रेंड काही गाण्यांवर रील्स व्हायरल होत आहेत. नुकतंच गणेशोत्सवात 'आमच्या पप्पांनी गंपती आणला' या गाण्याने सर्वांनाच वेड लावलंय. बरं लहान मुलांसाठी असलेल्या या गाण्यावर मोठेही नाचत आहेत. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी या गाण्यावर डान्स केला जो प्रेक्षकांना अजिबातच रुचला नाही. अविनाश नारकर यांना हे शोभत नाही अशी त्यांच्यावर टीका झाली. यानंतर त्यांनी तो व्हिडिओ डिलीट केला. या सर्व गोष्टी पाहता गार्गी फुलेने केलेली पोस्ट अतिशय सूचक वाटते.

गार्गी लिहिते,'सोशल मीडिया अतिशय प्रभावी माध्यम आहे. एखाद्याची कला लोकांसमोर सादर करायचं. रील्स, पोस्ट यांनी वारंवार कलाकार व्यक्त होत असतात. पण कधी कधी सिनियर लोकांच्या रील्स पाहिल्या की भीती वाटते. योगासनं, छान गाणी इथपर्यंत समजू शकते मी पण पावसात भिजताना, शॉर्ट्स घालून भटकंती करताना, गणपतीसमोर उड्या मारताना आपल्या वयाचा यांना विसर पडतो का? कोणाबरोबर बरोबरी करायची आहे यांना? आणि हे जर कामं मिळवण्यासाठी असेल तर काकू, आई आणि सासू...काका, सासरे, वडील याच भूमिका करताना दिसतात हे..मग हे वेडेचाळे करण्यामागे नक्की काय कारण असेल, कोणी सांगेल का? असो. #गार्गीउवाच #पडलेलाएकप्रामाणिकप्रश्न'

गार्गीने आपलं रोखठोक मत मांडत नक्की कोणावर निशाणा साधलाय याचा अंदाज नेटकरी लावत आहेत. गार्गी फुले 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात पोहोचली.यानंतर तिने 'सुंदरा मनामध्ये भरली' या लोकप्रिय मालिकेतही भूमिका केली आहे.

टॅग्स :गार्गी फुलेमराठी अभिनेतासोशल मीडियानिळू फुले