डोंबिवली फास्ट', 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाची अफवा सकाळपासून सगळीकडे पसरली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आल्याचे रितेश देशमुखने ट्विटरवर सांगितले होते. मात्र आज संध्याकाळी 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
निशिकांत कामत यांनी वयाच्या 50व्या वर्षी हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत कामत यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. निशिकांत कामत यांना यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास होत होता. आज त्यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र हॉस्पिटलकडून त्यांची प्रकृती गंभीर असून त्याला व्हेटिंलेटवर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. आता संध्याकाळी 4 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.निशिकांत कामत यांच्या निधनाच्या वृत्तावर कलाविश्वातील कलाकार सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान रितेश देशमुखने ट्विटरवर निशिकांत कामतसोबत गळाभेट करतानाचा फोटो शेअर करत ट्विट केले. त्यांनी म्हटले की, मित्रा तुझी खूप आठवण येईल. तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुखने ट्विट केले की, तू खूप दयाळू होता. माझ्या आयुष्यातील तू माझा प्रशिक्षक होतास. आपण खूप चर्चा केल्या आणि तू खूप चांगला व्यक्ती होतास. निशी, तूझी खूप आठवण येईल. तुझ्या आत्म्यास शांती मिळो.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष, अमेय खोपकर यांनी ट्विटरवर लिहिले की, अजून ‘लय भारी’ काम करायचं होतं मित्रा... तुझ्याइतका शांतचित्त दिग्दर्शक मी तरी अजून पाहिलेला नाही. आता तर अगदीच शांत झालास... अजून काय लिहू? तू तर मनातलं ओळखायचास आणि गूढ हसायचास... तसाच गूढपणे गूढ देशी निघून गेलास तुझी आठवण सतत येत राहणार दोस्ता...