प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांनी कर्जतच्या ND स्टुडिओत आत्महत्या केली. नितीन देसाई यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला हादरा बसला आहे. अत्यंत कुशल कलावंत आपण गमावला आहे. नितीन देसाई यांचा जन्म दापोली येथे झाला. त्यांच्या आत्महत्येची बातमी कळताच रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील पाचवली गावावर शोककळा पसरली.
नितीन देसाई यांचे मुळगाव दापोली तालुक्यातील पाचवली आहे. नितीन देसाई दरवर्षी गणपतीत पाचवली येथील घरी येत असतात. गावात नितीन देसाई यांचे मूळ घर आहे. आई, वडील भावंड याच गावात होते. नितीन देसाई यांची गावातील मारुती मंदिर वर श्रद्धा होती. काही चित्रपटांचे प्रमोशन देसाई यांनी आपल्या गावातील मंदिरात केले होते. देसाई यांच्या आत्महत्येची बातमी कळताच गावातील अनेक नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. नितीन यांचे बालपण पाचवली गावात गेले. त्यांनी गावातील मराठी शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. गावात त्यांच्या खूप आठवणी आहेत गावाबद्दल त्यांना खूप ओढ होती. दरवर्षी शिमगा आणि गणपतीत ते आपल्या गावी येत असत.
नितीन देसाई यांनी कर्जाच्या ओझ्याखाली येत इतकं टोकाचं पाऊल उचललं असल्याची शक्यता आहे. यासंबंधात पोलिस तपास करत आहेत. दरम्यान नितीन देसाई यांची मुलगी आणि जावई अमेरिकहून परत आल्यावर उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सध्या त्यांचे पार्थिव मुलुंड येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.