मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी २ ऑगस्टला आत्महत्या करत जीवन संपवलं. नितीन देसाईंनी कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने कुटुंबीयांना जबर धक्का बसला. नितीन देसाईंवर कोट्यवधींचं कर्ज होतं. कर्ज वसुलीच्या तगाद्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांची पत्नी नेहा देसाई यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी खालापूर पोलीस स्थानकांत एडलवाईज ग्रुप आणि इसीएल फायन्सान कंपनीतील चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नितीन देसाई यांची मुलगी मानसी देसाई यांनी एएनआयशी बातचीत केली. त्या म्हणाल्या, “माझ्या बाबांनी १८१ कोटींचं कर्ज घेतलं होतं. त्यातील ८६.३१ कोटींच्या कर्जाची परतफेड आम्ही फेब्रुवारी २०२० पर्यंत केली होती. पण, करोनामुळे बॉलिवूडला धक्का बसला. बाबांकडे काम नसल्याने त्यांना स्टुडिओ बंद करावा लागला. त्यामुळे आम्ही नियमितपणे कर्जाचे हफ्ते फेडू शकलो नाही. त्याआधी एडलवाईज कंपनीने आमच्याकडे सहा महिन्यांची रक्कम मागितली होती. माझ्या बाबांनी पवईचं ऑफिस विकून त्यांची मागणी पूर्ण केली होती. बाबांना कोणालाही फसवायचा हेतू नव्हता.”
“नितीन देसाईंवर कोणताही दबाव नव्हता”, कर्ज देणाऱ्या कंपनीचा मोठा दावा, म्हणाले "२५२ कोटींचं कर्ज..."
“बाबांनी गेली दोन वर्ष कंपनीशी बोलून कर्जाची परतफेड करण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. कंपनीनेही त्यांना आश्वासनं दिली होती. कंपनी त्यांची मदत करेल, असंही त्यांना सांगितलं होतं. पण, कंपनीने कायदेशीर कारवाई सुरू केली. काही गुंतवणूकदार बाबांना मदत करायला तयार होते, पण त्यांनी मदत करू दिली नाही. बाबांबद्दल चुकीची माहिती आणि वृत्त पसरवू नका, एवढीच माझी विनंती आहे. माझ्या बाबांनी खूप मेहनत करुन नाव कमावलं होतं, ते मातीत मिळवू नका. या प्रकरणाचा तपास करावा, अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे. त्यांचा स्टुडिओ राज्य सरकारने ताब्यात घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, ही माझ्या बाबांची शेवटची इच्छा होती,” असं म्हणत मानसी देसाई यांनी भावनिक साद घातली आहे.
नितीन देसाई यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे सेट उभारले होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी(४ ऑगस्ट) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.