मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्टला आत्महत्या करत जीवन संपवलं. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेतला. अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांचे सेट त्यांनी उभारले होते. आर्थिक विंवचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी(४ ऑगस्ट) एन.डी. स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
नितीन देसाई यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी एन.डी, स्टुडिओमध्ये ठेवण्यात आलं होतं. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी नितीन देसाई यांचं अंत्यदर्शन घेतलं. सुबोध भावे, मानसी नाईक, अभिजीत केळकर हे कलाकार उपस्थित होत. तर बॉलिवूड अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीही नितीन देसाईंच्या पार्थिवाचं दर्शन घेत त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
नितीन देसाईंना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. लाडक्या बाबांना निरोप देताना नितीन देसाईंच्या मुलीच्या अश्रूचा बांध फुटला. नितीन देसाईंच्या मोठ्या मुलीचं एन.डी. स्टुडिओमध्येच काही महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं होतं. लेकीबरोबरच नितीन देसाईंचा जावईही त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी भावुक झाला होता.
'देवदास', 'जोधा अकबर', 'लगान', 'अजिंठा' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी नितीन देसाईंनी कला दिग्दर्शकाचं काम पाहिलं होतं. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ते लालबागचा राजाच्या मंडपाची उभारणी करणार होते. त्यांच्यावर कोट्यवधींचं कर्ज होते. ते कर्ज वसुलीच्या तगाद्याने त्रस्त होते. नितीन देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्यात एका फायनान्स कंपनीविरोधात तक्रार नोंदवली आहे.