सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी जीवन संपवलं. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी काम केलं होतं. अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी नितीन देसाई यांनी सेट उभारले होते. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांनी नितीन देसाईंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मराठीतील लोकप्रिय लेखक क्षितीज पटवर्धन याने नितीन देसाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत क्षितीजने नितीन देसाईंच्या आत्महत्येवर शोक व्यक्त केला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. "परिस्थितीच्या रेट्यामुळे एकटी पडलेली अनेक माणसं आपल्याही आसपास असतात. गरज आहे ते आपण त्यांच्यासाठी आहेत हे सांगायची. त्यांच्या कठीण प्रसंगात उभं राहायची. फक्त कामापुरती मैत्री न ठेवता कामाव्यतिरिक्त विचारपूस करायची. सरतेशेवटी आपली या जगात कोणालातरी काळजी आहे, ही एक भावनासुद्धा माणसाला तग धरायला पुरेशी असते. ती काळजी आपण करायला हवी आणि कधीकधी स्वत:हून दाखवायला हवी," असं क्षितीजने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
क्षितीजने या पोस्टला "आपल्या सगळ्यांना गरज आहे कुणीतरी असायची आणि कुणासाठी तरी असायची," कॅप्शन दिलं आहे. नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर क्षितीजने केलेली ही पोस्ट चर्चेत आली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकरांबरोबरच चाहत्यांनीही कमेंट करत नितीन देसाईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
नितीन देसाई यांनी 'लगान', 'देवदास', 'हम दिल दे चुके सनम', 'दौड', 'रंगीला' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी दिग्दर्शन केलं होतं. ८०च्या दशकापासून नितीन देसाई यांनी त्यांच्या कलाविश्वातील कारकीर्दीला सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी दूरदर्शनवरील 'तमस' मालिकेसाठी काम केलं होतं. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या '१९४२ : अ लव्ह स्टोरी' या विनोद चोप्रांच्या चित्रपटातून त्यांना पहिला ब्रेक मिळाला होता. या चित्रपटात अनिल कपूर, मोनिषा कोईराला, जॉकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते.