प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कर्जतच्या एनडी स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली. नितीन देसाई यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलावं यावर कोणालाच विश्वास बसत नाहीए. कर्जाच्या बोज्याखाली येत त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. देसाई कलेमध्ये अतिशय कुशल होते. 'जोधा अकबर', 'देवदास' सारख्या सिनेमांची खरी ओळख म्हणजे त्यातील भव्य सेट होते. हेच सेट नितीन देसाई यांच्या कल्पनेतून साकार झाले होते. इतकंच नाही तर दरवर्षी मुंबईच्या लालबागच्या राजाचा देखावा नितीन देसाई हेच करायचे.
नितीन देसाईंची गणपतीवर प्रचंड श्रद्धा होती. मुंबईच्या लालबागच्या राजाचा देखावा बघण्यासाठी दूरवरुन लोकं येतात. नितीन देसाई दरवर्षी डोळ्यांचं पारणं फिटेल असा देखावा करायचे. यंदाच्याही देखाव्याचं नियोजन झालं होतं. मात्र त्यांनी लालबागच्या राजाला अखेरचा नमस्कार करत आपली जीवनयात्रा संपवली. यावर्षी त्यांच्या कल्पनेतील देखावा नेमका कसा असणार होता हे सांगताना मंडळाचे सचिव सुधीर साळवी म्हणाले, '४ जुलै रोजीच मंडप पूजन झालं आणि दादांनी कामाला सुरुवात केली होती. रविवारीच ते टीमसोबत लालबागच्या राजाच्या स्टेजवर आले आणि अंतिम टप्प्यातील कामाला सुरुवात झाली होती. दादांचा आवडता विषय छत्रपती शिवाजी महाराज आणि ३५० वा राज्याभिषेक सोहळा म्हणून त्याप्रकारचा देखावा साकारण्यात येणार होता. रविवारी आमच्यासोबत थांबून त्यांनी ७० ते ८० टक्के काम पूर्ण केलं. सांगायला खेद वाटतो की बुधवारी आमची मीटिंग ठरली होती आणि ही बातमी कानावर आली.'
ते पुढे म्हणाले, 'दादा गेल्या १५ वर्षांपासून लालबागच्या राजाच्या मंडळाच्या परिवारातले ते एक सदस्य होते. जो मेन गेट बनेल त्यावर नक्कीच दादांना आदरांजली वाहण्यात येईल.'
यंदा लालबागच्या राजाचा देखावा नितीन देसाईंनी साकारला असला तरी पुढच्या वर्षीपासून मात्र त्यांची कला बघायला मिळणार नाही अशी खंत प्रत्येक जण व्यक्त करत आहे. नितीन देसाईंच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडमधून आमिर खान, संजय लीला भन्साळी, मधुर भांडरकर यांनी हजेरी लावली.