प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी एन.डी. स्टुडिओमध्येच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कला विश्वातील अनेक कलाकारांबरोबरच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. नितीन देसाई हे खऱ्या अर्थाने चित्रपट सृष्टीतील एक महत्त्वाचे नाव होते. मराठी माणसाला अभिमान वाटावा असे काम त्यांनी केले. केवळ मराठी चित्रपटच नाही, तर अनेक हिंदी चित्रपटाचे सेट त्यांनी उभारले होते.
आपल्या लाडक्या कलादिग्दशर्काला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र इतकी वर्ष हिंदीत काम करुनही काही मोजकेच हिंदीतले चेहरे देसाईंना निरोप देण्यासाठी एन.डी. स्टुडिओमध्ये आले होते. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या आमिर खानला पत्रकारांनी यासंबंधीत प्रश्न विचारला. नितीन देसाईंनी ज्या हिंदी सिनेमांसाठी भलेमोठे सेट्स उभारले, असे बॉलिवूड सेलिब्रिटी का आले नाहीत, असा सवाल आमिर खानला विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना आमिर म्हणाला, आम्ही जो जिता ओ सिकंदरपासून एकत्र काम करतोय. मला वैयक्तिक खूप दुःख झालंयअसं घडलंय मला खरं वाटत नाही. पण खूपच दुःखद बातमी आहे.. "
आमिर खान पुढे म्हणाला.. "मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. नितीनजीनी खूप कमाल काम केलंय.. खूप हुशार आणि क्रिएटिव्हिटी असलेला माणूस होता. मी शेवटचं त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या आधी भेटलो होतो. ते मुलीच्या लग्नाचं निमत्रण द्यायला मला आले होते. बॉलिवूड मधील काही लोक येऊ शकली नाहीत त्यामागे त्यांची काही वेगळी कारण असतील. पण मला खात्री आहे की प्रत्येक कलाकाराच्या मनात त्यांचं एक खास स्थान आहे." नितीन देसाईं अखेरचा निरोप देताना आमिर खानचे डोळे पाणावले होते.
‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘अजिंठा’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी नितीन देसाईंनी कला दिग्दर्शकाचं काम पाहिलं होतं. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ते लालबागचा राजाच्या मंडपाची उभारणी करणार होते. त्यांच्यावर कोट्यवधींचं कर्ज होते. कर्ज वसुलीच्या तगाद्याने त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं नितीन देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांचं म्हणणं आहे. त्यांनी खालापूर पोलीस ठाण्यात एका फायनान्स कंपनीविरोधात तक्रार नोंदवली आहे.