मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी बुधवारी(२ ऑगस्ट) गळफास घेत जीवन संपवलं. कर्जतच्या एन.डी. स्टुडिओमध्ये नितीन देसाईंनी आत्महत्या केली. तेथील एका खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टी हळहळली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सेलिब्रिटींनी नितीन देसाईंच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना अभिनेता गश्मीर महाजनीने सुनावलं आहे.
गश्मीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नितीन देसाईंना श्रद्धांजली वाहिली. याबरोबरच त्याने नितीन देसाईंच्या आत्महत्येवर प्रश्न विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. "नितीन देसाईंनी आत्महत्या केली आहे. अनेकांनी याबाबत पोस्ट केलं आहे. जेव्हा कोणाचं तरी निधन होतं तेव्हा त्या व्यक्तीबद्दल मत न बनवता आपण श्रद्धांजली देऊ शकत नाही का? लोक त्यांची मतं मांडत आहेत. पण, त्यांचं कुटुंबीय कोणत्या परिस्थितीतून जात असतं, याची तुम्हाला जाणीव असते का? जर तुम्हाला या गोष्टीबद्दल ठाऊक नाही तर तुम्ही गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी प्रार्थना करा. कदाचित, तुमच्या आजुबाजूची माणसे तुमची मते ऐकत नसावीत, त्यामुळेच तुम्ही सोशल मीडियावर ती पोस्ट करता," असं गश्मीरने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सुबोध भावेने केला पुणे मेट्रोने प्रवास, फोटो शेअर करत म्हणाला...
गश्मीरचे वडील आणि मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं जुलै महिन्यात निधन झालं. तळेगाव येथील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. ते कुटुंबापासून दूर एकटेच राहत असल्याने त्यांच्या निधनावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. गश्मीर व त्याच्या कुटुंबीयांना ट्रोलही करण्यात आलं होतं. तेव्हाही गश्मीरने नेटकऱ्यांना खडे बोल सुनावले होते.