खासदार मनेका गांधी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली असून भारतीय पशुवैद्यक संघटनेने मनेका गांधी यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी बुधवारी देशभरातील पशुवैद्यकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. खासदार गांधी यांनी पशुवैद्यकांना वारंवार अपमानित करण्याचा प्रकार थांबवला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेदेखील तक्रार केली आहे.
मनेका गांधी यांचा अधिकाऱ्यासोबतचा फोनवरील संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात त्या यात अपशब्द वापरताना दिसत आहे. यावरून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यावरून #BoycottManekaGandhi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड झाला आहे. अभिनेते आणि माजी खासदार नितिश भारद्वाज यांनी एक ट्वीट करून सोशल मीडियावर मनेका गांधी यांना चांगलेच सुनावले आहे.
त्यांनी ट्वीट केले आहे की, बारावी पास असलेल्या मनेका गांधी यांनी एका पशुवैद्यकाच्या बाबतीत नव्हे तर संपूर्ण प्रोफेशनच्या विरोधात अतिशय वाईट आणि अपमानित भाषा वापरली आहे. अशा व्यक्तीला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाहीये. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केले आहे.
नितिश हे स्वतः पशुवैद्यक असून त्यांनी महालक्ष्मी रेसकोर्समध्ये कामही केले आहे. नितिश यांनी महाभारतानंतर कृष्णाची भूमिका साकारली होती. त्यांना आजही प्रेक्षक कृष्ण म्हणूनच ओळखतात. नितिश यांची लोकप्रियता प्रचंड वाढल्यानंतर त्याला भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेचे तिकीट देखील देण्यात आले होते. नितिश जमशेदपूर येथून निवडून देखील आले आणि खासदार बनले. पण त्यांनी काहीच काळात राजकारणाला रामराम ठोकला. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची समांतर 2 ही वेबसिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
उत्तर प्रदेशातील एका पशुवैद्यकाने श्वानावर शस्त्रक्रिया करून श्वानमालकाला उपचाराचा मोबदला मागितला. मात्र, उपचारादरम्यान तो श्वान वाचू शकला नाही. याची माहिती मिळताच खासदार मनेका गांधी यांनी पशुवैद्यकासोबत फोनवर संवाद साधत त्याला अपशब्द वापरले. उपचाराचे ७० हजार तुम्ही परत करा अन्यथा तुमच्यावर मी स्वत: कारवाई करेल, अशी धमकी त्यांनी दिली. पशुवैद्यक त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना देखील त्याचे म्हणणे ऐकू न न घेता त्याला धमकावण्यात आले.