‘नो अॅवॉर्ड प्लीज’
By Admin | Published: January 25, 2017 02:52 AM2017-01-25T02:52:20+5:302017-01-25T02:53:01+5:30
डिसेंबर महिना आली, की बॉलिवूडला वेध लागतात ते पुरस्कार सोहळ्याचे. चित्रविचित्र पोशाखांत रेड कार्पेटवर उतरणाऱ्या बॉलिवूडच्या त्याच-त्या ग्लॅमरस नट्या
डिसेंबर महिना आली, की बॉलिवूडला वेध लागतात ते पुरस्कार सोहळ्याचे. चित्रविचित्र पोशाखांत रेड कार्पेटवर उतरणाऱ्या बॉलिवूडच्या त्याच-त्या ग्लॅमरस नट्या, त्यांच्याच तोडीला तोड असलेले तेच ते हँडसम नट, त्यांचे एकापेक्षा एक हटके स्टेज परफॉर्मन्स, शो होस्ट करणाऱ्यांचे व्हेज-नॉनव्हेज जोक्स आणि त्यादरम्यान पुरस्काराच्या बाहुल्या घेऊन मिरवणारे विनर्स.... सगळे कसे भारावणारे वातावरण. कुठल्याशा चॅनलवर हा सोहळा रंगतो. प्रेक्षक मायबाप घरातल्या टीव्हीवर जाहिरातींचा मारा सहन करीत या सोहळ्याचा आनंद घेतो आणि अॅवॉर्ड शो संपतो. अॅवॉर्ड शो कुठलाही असो, शाहरुख, सलमान, करण जोहर हे नेहमीचे चेहरे या सोहळ्यात दिसणारच आणि आमिर खानसारखे काही मोजके सेलिब्रिटी या शोमध्ये नसणारच, हे जणू आताशा समीकरण झाले आहे. आमिर बॉलिवूडच्या कुठल्याच पुरस्कार सोहळ्यात जात नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. दोन दशकांपूर्वी आमिरने बॉलिवूडमध्ये हा ट्रेंड आणला आणि आता बॉलिवूडचे अनेक स्टार्स आमिरच्या या वाटेवरून चालताना दिसत आहेत. अॅवॉर्ड शोकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या अशाच काही बॉलिवूड स्टार्सबद्दलची माहिती या लेखात...
आमिर खान
आमिर खानने त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिलेत. त्याच्या बऱ्याच सिनेमांना अनेक बॉलिवूड पुरस्कार सोहळ्यात नामांकने मिळाली, पुरस्कारही मिळाले; पण आमिरचे म्हणाल, तर १९९२नंतर कुठल्याच अॅवॉर्ड शोच्या स्टेजवर तो दिसला नाही. १९९२मध्ये आमिर खानचा ‘जो जिता वही सिंकदर’ सिनेमा प्रचंड गाजला. याच वेळी अनिल कपूरचा ‘बेटा’ सिनेमाही रिलीज झाला होता. त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्याला मिळेल, असा आमिरला पक्का विश्वास होता; पण झाले भलतेच. हा पुरस्कार अनिल कपूरच्या वाट्याला गेला. ही बाब आमिरच्या प्रचंड जिव्हारी लागली. यानंतर पुढच्याच वर्षी आमिरचा ‘हम हैं राही प्यार के’ आला. १९९५मध्ये ‘रंगीला’ आला. पण आमिरच्या अभिनयाची एकाही पुरस्कार सोहळ्यात दखल घेतली गेली नाही. यानंतर मात्र आमिरचा पुरस्कार सोहळ्यांवरून विश्वास उडाला तो कायमचा. माझा कुठल्याही पुरस्कार सोहळ्यावर विश्वास नाही; त्यामुळे मी त्यापासून लांब राहणेच पसंत करतो, असे आमिर म्हणतो ते त्याचमुळे.
अजय देवगण
अभिनेता अजय देवगणने ‘जख्म’ आणि ‘दी लीजेंड आॅफ भगत सिंह’ या चित्रपटांसाठी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावले. पण, आमिरप्रमाणेच अजयसुद्धा कुठल्याच अॅवॉर्ड शोमध्ये दिसला नाही. ‘गेल्या १५ वर्षांत मी कधीच कुठल्या अॅवॉर्ड शोला गेलेलो नाही. बॉलिवूडचे अॅवॉर्ड म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. निव्वळ पैसा कमावण्याचा धंदा आहे. अॅवॉर्ड शोचे आयोजक टीव्ही वाहिन्यांशी सेटिंग करतात. म्हणून बड्या-बड्या स्टार्सना या ठिकाणी बोलावले जाते. जो अॅवॉर्ड शोमध्ये येईल, परफॉर्म करेल त्याला पुरस्कार मिळेल, असे साधेसोपे गणित आहे. त्यामुळे माझा यावर विश्वास नाही,’ असे अजयने अलीकडे एका मुलाखतीत अगदी उघड-उघड सांगितले होते.
अक्षय कुमार
आपल्या दोन दशकांच्या करिअरमध्ये अक्षय कुमारच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर शंभर कोटींचा गल्ला जमवला; पण अक्षयच्या कुठल्याही चित्रपटाला अद्यापही लोकप्रिय चित्रपटाचा अॅवॉर्ड मिळालेला नाही. याचे कारण म्हणजे, अक्षय कुठल्याच अॅवॉर्ड शोमध्ये जात नाही. सर्व अॅवॉर्ड शो म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. ‘तुम्हाला पुरस्कार मिळेल; पण अर्धे पैसे तुम्हाला खचार्वे लागतील, असे अनेक पुरस्कार सोहळ्यांच्या आयोजकांनी मला बोलून दाखविले आहे. अशा सोहळ्यांत मी का जाऊ?’ असा अक्षयचा सवाल आहे तो यामुळेच.
इम्रान हाश्मी
आमिरप्रमाणेच बॉलिवूडचा ‘सिरीयल किसर’ इम्रान हाश्मी याचाही बॉलिवूडमध्ये रंगणाऱ्या पुरस्कार सोहळ्यांवर विश्वास नाही. इम्रानने ‘मर्डर, गँगस्टर, डर्टी पिक्चर, शांघाय’ असे अनेक ब्लॉकबस्टर दिलेत; पण अॅवॉर्ड फंक्शनचे म्हणाल, तर इम्रान कायम त्यापासून दूर राहिला. अलीकडे एका मुलाखतीत इम्रानने यामागचे कारण सांगितले होते. ‘अॅवॉर्ड शोमध्ये काहीही ‘रिअल’ नसते. मी अॅवॉर्ड शोमध्ये परफॉर्म केला, तर माझा अॅवॉर्ड पक्का, असे मला जेव्हा कळले, तेव्हापासून पुरस्काराबद्दलची माझ्या मनातील इच्छा कायमची संपली. माझा चित्रपट पाहायला लोक पैसे खर्च करून येतात, हा माझ्यासाठी पुरस्कार आहे,’ असे इम्रान म्हणाला होता.
कंगना रणौत
‘मी यापुढे कुठल्याही अॅवॉर्ड शोमध्ये जाणार नाही,’ असे या वर्षी कंगनाने जाहीर करून टाकले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. सन २०१४मध्ये ‘क्वीन’मधील भूमिकेसाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. राष्ट्रीय पुरस्कारांवरही तिने नाव कोरले; पण याचदरम्यान कंगनाचा बॉलिवूडच्या पुरस्कार सोहळ्यांवरून विश्वास उडाला तो उडालाच. ‘मी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला तेव्हा मला अनेक पुरस्कार मिळाले. नॅशनल अॅवॉर्डही मिळाला; पण त्यानंतरही सुमारे दोन वर्षे मला काही काम मिळाले नाही. कलाकार अॅवॉर्ड शोला हजर राहणार आहे की नाही, हे जाणून घेतल्यानंतर त्याला पुरस्कार द्यायचा की नाही, हे ठरवले जात असेल तर मला असे पुरस्कार स्वीकारण्यात अजिबात रस नाही,’ असे कंगनाने या वेळी जाहीर करून टाकले.
नवाझुद्दीन सिद्दिकी
‘कहानी, गँग आॅफ वासेपूर, तलाश’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनय साकारणारा नवाझुद्दीन सिद्दिकीही आमिर, अजय व अक्षय यांच्याच रांगेतला. बॉलिवूडचे अॅवॉर्ड प्रतिभा पाहून नाही, तर तोंड पाहून दिले जातात. अनेक अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे योगदान दिलेय; पण त्यांना कधीच कुठल्या अॅवॉर्डने गौरविले गेले नाही, असे नवाझुद्दीनचे स्पष्ट मत आहे. याच कारणामुळे कुठल्याही अॅवॉर्ड शोमध्ये नवाझुद्दीन दिसत नाही.
जॉन अब्राहम
बॉलिवूडचा अॅक्शन स्टार जॉन अब्राहम याला अॅवॉर्ड शोचे वावडे आहे. त्याची यामागची थिअरी एकदम क्लिअर आहे. ‘अॅवॉर्ड सेरिमनी टीआरपी बेस्ड असतात. मला असे इव्हेंट सर्कससारखे वाटतात. मी अॅवॉर्ड जिंकणार आहे, असे मला एकदा सांगितले; पण जर मी परफॉर्म करणार असेन तर तो मला मिळेल, ही अटही सोबत होती. अशा अॅवॉर्ड शोला न गेलेलेच बरे,’ असे जॉन म्हणतो.