बॉलीवूडमध्ये पुनरागमनाच्या निमित्ताने पल्लवीच्या ‘सीएनएक्स’शी मनमोकळ्या गप्पाअभिनेत्री पल्लवी जोशी जवळजवळ २० वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. ‘बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम’ या चित्रपटात अभिनेता अनुपम खेरच्या पत्नीची भूमिका ती साकारणार आहे. एवढंच नव्हे, तर या चित्रपटात ती एक गाणंही गात आहे. या चित्रपटाद्वारे एक पार्श्वगायिका म्हणून ती एक नवीन इनिंगला सुरुवात करताना दिसतेय. तिच्या या नवीन इनिंगचे अनेक गुपिते तिने ‘सीएनएक्स’सोबत शेअर केली.प्रश्न : तू अनेक वर्षं बॉलिवूडपासून लांब होतीस. काय कारण?मी बॉलिवूडपासून लांब असली तरी अभिनयापासून कधीच दूर गेलेली नव्हती. मी मराठी मालिकांमध्ये काम करत होती. तसेच मी मराठी मालिकांची निर्मितीही करत होती. या सगळ््या गोष्टींमध्ये मी व्यस्त असल्याने बॉलिवूडला वेळ देवू शकली नाही. तितक्या सशक्त भूमिकाही कुणी आॅफर केल्या नाहीत. यामुळे चांगली भूमिका असेपर्यंत बॉलिवूडमध्ये काम करायचे नाही असेच मी ठरवले होते. प्रश्न : बॉलिवडमध्ये कमबॅकसाठी बुद्धा इन अ ट्रफिक जॅम हाच चित्रपट का?या चित्रपटाचे दिग्दर्शन माझे पती विवेक अग्निहोत्री करत आहेत. विवेकने याआधी गोल या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यावेळी मी त्या चित्रपटात काम करावे अशी विवेकची इच्छा होती. पण चित्रीकरणासाठी मला दोन महिने तरी लंडनला जावे लागणार होते. माझी मुले त्यावेळी खूपच लहान असल्याने माझ्यासाठी ते शक्य नव्हते. त्यामुळे मी गोलमध्ये काम केले नाही. पण बुद्धा इन अ ट्रफिक जॅम या चित्रपटाच्यावेळी सगळ््या गोष्टी जुळून आल्यामुळे मी या चित्रपटासाठी होकार दिला. प्रश्न : या चित्रपटाद्वारे पार्श्वगायिका म्हणून नव्या करियरला सुरुवात करत आहेस, हे खरं आहे का?एक पार्श्वगायिका म्हणून मी या चित्रपटाद्वारे माझ्या करियरला सुरुवात करतेय असे मी म्हणणार नाही. कारण मी संगीत शिकले असले तरी मी रोज रियाज करत नाही. यामुळे मी कधी पार्श्वगायिका बनू शकेन याचा मी विचारही केलेला नाही. यात मी गाणे गायले त्यासाठीही काही कारणे आहेत. यात मी एक अतिशय संथ गझल गायली आहे. दृश्याच्या मागणीनुसार या गाण्यात कोणत्या वाद्यांचाही वापर करण्यात आलेला नाही. तसेच संगीतात अतिशय पारंगत असलेल्या गायिकेचा आवाज या गाण्यासाठी असणे आवश्यक नव्हते. त्यामुळे या चित्रपटातील माझा आवाज योग्य असल्याचे विवेकचे मत होते. प्रश्न : गाणे रेकॉर्डिंगचा तुझा अनुभव कसा होता?मी खूप चांगली गायिका नसल्याने रेकॉर्डिंग करताना चांगलीच घाबरले होते. विवेकने मला गाण्याबद्दल विचारले तेव्हा मी गाऊ शकते असे वाटतेय का तुला असा उलट प्रश्नच मी त्याला विचारला होता. पण त्याने मला गाण्याची संकल्पना सांगितल्यावर मी हे गाणं गायला तयार झाले. मी पूर्वी सारेगमपा, अंताक्षरी यामध्ये गाणी गायली आहेत. पण चाँद रोज या गाण्यात कोणत्याही प्रकारच्या वाद्यांचा वापर करण्यात आलेला नसल्याने माझ्या आवाजाशिवाय गाण्यात काहीही नव्हते. त्यामुळे मला जास्त टेन्शन आले होते. पण एकदा होकार दिला आहे तर गायचे असे ठरवून मी आत्मविश्वासाने रेकॉर्डिंगला गेली आणि तिथे चांगली गायली.प्रश्न : भविष्यात तुझा पार्श्वगायन करण्याचा विचार आहे का?मी अभिनयात सरस आहे याची मला कल्पना आहे. पण गायनाचा रियाज मी करत नसल्याने मी त्यात पारंगत नाही. गायनात रियाज हा खूप महत्त्वाचा असतो. एखादी भाषा येत नसेल तर व्यक्ती ती भाषा तुटक्याफुटक्या पद्धतीने बोलतो, पण ती ऐकताना आपल्याला त्याच्यातील चुका लगेचच लक्षात येतात. त्याचप्रमाणे गायक गायनात पारंगत आहे की नाही हे लोकांच्या लगेचच लक्षात येते. मला गायला आवडते. माझी हौस म्हणून मी अनेकवेळा घरात गाते. मित्रांच्या घरी, घरात कार्यक्रम असतील तर मी गाते. या सगळ््या गोष्टी मी एन्जॉय करते. पण मी करिअर म्हणून पार्श्वगायन करण्याचा अद्याप तरी विचार केलेला नाही. प्रश्न : टीव्हीवरही कित्येक वर्षांनंतर कमबॅक केलेस. हा निर्णय कसा घेतला?मी पूर्वी मालिकांमध्ये काम केले असले तरी मी कोणत्याही डेली सोपमध्ये काम केलेले नव्हते. डेली सोपला दिवसातील किती तास द्यावे लागतात याची मला चांगलीच कल्पना आहे. तसेच डेली सोप उगाचच ताणले जातात, त्याची कथा भरकटते. पण ही मालिका केवळ १३० भागांची असणार असे मला आधीच सांगण्यात आले होते. त्यामुळे या मालिकेची कथा कुठे भरकटणार नाही याची मला खात्री आहे. तसेच ही मालिका कमी भागांची असल्याने मला केवळ सहा महिनेच चित्रीकरण करायचे आहे हे मला माहीत असल्याने मी ही मालिका करण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे या मालिकेत मी ३० वर्षाच्या आणि ८० वर्षांच्या वृद्धेची अशा दोन भूमिका साकारत आहे. एक अभिनेत्री म्हणून अशा भूमिका करायला सगळ््याच कलाकारांना आवडतात. प्रश्न : मराठी चित्रपट अथवा मालिकेत काम करण्याचा विचार आहे का?सध्या तरी मराठी मालिका, चित्रपटात काम करण्याचे अथवा मालिकेची निर्मिती करण्याचे मी ठरवलेले नाही.
पार्श्वगायिका बनण्याचा विचार नाही!
By admin | Published: May 09, 2016 1:48 AM