गुड्डू रंगीला हिंदी चित्रपट- अनुज अलंकार
‘फस गये रे ओबामा’ आणि ‘जॉली एलएलबी’सारखे चांगले चित्रपट दिग्दर्शित करणारे सुभाष कपूर यांच्या ‘गुड्डू रंगीला’ने मात्र निराश केले. ‘गुड्डू रंगीला’ बनविताना त्यांचा खूपच गोंधळ झाला आहे. अनेक मुद्दे एका माळेत ओवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे ती एक विचित्रच खिचडी बनली व पर्यायाने त्यात मनोरंजन असे काहीच नाही.गुड्डू (अमित सद) आणि रंगीला (अर्शद वारसी) हे हरियाणातील गावात लहानमोठे गुन्हे करून पोट भरत असतात. एके दिवशी त्यांना एका मुलीचे अपहरण करण्याची आॅफर येते. पैशांसाठी ते त्यास तयार होतात. चंदिगढ येथून ते बेबीला (अदिती राव हैदरी) पळवून योजनेनुसार सिमल्यात येतात. तिचा मेहुणा बिल्लू (रोनित रॉय) हरियाणातील गुंड असून त्याचे मोठे वजन तेथील खाप पंचायतींवर आहे. बिल्लूने बेबीची बहीण आणि स्वत:च्या पत्नीचा छळ केलेला असतो. त्यामुळे बेबीला त्याचा सूड घ्यायचा असतो. रंगीलाचेही त्याच्याशी जुने वैर असते. दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केले म्हणून बिल्लूने खाप पंचायतीच्या माध्यमातून रंगीलाच्या पत्नीची हत्या केली होती. शेवटी बिल्लूचे सगळे शत्रू एक होऊन त्याला योग्य ती शिक्षा करतात.उणिवा - दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी निवडलेल्या कथेतच जीव नाही. चित्रपटच बनवायचे ठरले होते तर त्यात भरपूर मनोरंजन असेल याची काळजी घेणे आवश्यक होते. त्यांच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांत मनोरंजन होते. लेखक या नात्याने सुभाष कपूर यांनी मनोरंजन कमी आणि सामाजिक प्रश्न हाताळण्याच्या प्रयत्नांत चित्रपट दिशाहीन करून टाकला आहे. रंगीला आणि गुड्डू या भूमिकाच एवढ्या तकलादू आहेत की त्यांना काही वेगळे करण्याची संधीच मिळाली नाही. आपण खाप पंचायत, आॅनर किलिंग व महिलांवर होणारे अत्याचार हा विषय या चित्रपटाच्या माध्यमातून देशासमोर मांडू या विचारांतून कपूर यांनी चित्रपटाचा कचरा करून टाकला. साहजिकच यात मनोरंजन कुठेच नाही. अर्शद वारसी विनोदी भूमिका चांगल्या करतो. परंतु रंगीलाची भूमिका फारच गंभीर बनविण्यात आली. एवढ्या गंभीर भूमिकेतील अर्शद वारसी प्रेक्षकांना पचतच नाही. अमित सदला तर आपली भूमिका नेमकी काय हेच समजले नाही. अदिती राव हैदरीचे बेबी हे पात्र प्रारंभीच प्रभावी ठरले व नंतर त्याचा फुगा फुटला. चित्रपटातील प्रमुख तीन व्यक्तिरेखाच जर गोंधळलेल्या असतील तर इतर कलावंत काय प्रभाव पाडणार?‘माता का ई-मेल आया हैं...’ हे गाणे बहुधा वाद निर्माण व्हावा यासाठीच ठेवण्यात आले असावे. इतर गीतांमध्ये सांगावे असे काही नाही. लेखक आणि दिग्दर्शक या नात्याने सुभाष कपूर सपशेल अपयशी ठरले आहेत. चित्रपट तांत्रिक पातळीवरही सामान्य आहे.