बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही मुंबईत तिच्या घरी लॉकडाऊन आहे, सोशल मीडियावर ती सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच घरात बंदिस्त असलेल्या लाखों चाहत्यांचेही ती चांगलेच मनोरंजन करत आहे. दिलबर दिलबर म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री नोरा फतेही तिच्या दिलखेचक डान्ससाठी ओळखली जाते. तसेच नोरा बऱ्याचदा सोशल मीडियावरील व्हिडिओ व फोटोंमुळे चर्चेत येत असते. ती फक्त मोठ्यांचीच नाही तर बच्चेकंपनीची देखील फेव्हरेट आहे. विविध व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असून वाहवा मिळवत असते या व्यतिरिक्त नोरा मदतीसाठी पुढे आली आहे. व्हिडीओ शेअर करत तिने जनजागृती करण्याचेही काम केले आहे.
तिने म्हटले आहे की, आज आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत ते केवळ पोलिस, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर आणि स्वच्छता कर्मचारी यांच्यामुळेच. नागरिकानी सुरक्षित रहावे यासाठी रोज घराबाहेर पडत आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र या कोरोना काळात आपणही त्यांची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
या क्षणी बर्याच साधनांची आपल्याकडे कमतरता आहे, त्यामध्ये पीपीई किट्स देखील खूप आवश्यक आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारणे आपले कर्तव्य आहे म्हणत नोराने भारतातील सरकारी रुग्णालयांमध्ये पीपीई किटसचे वाटप केले आहे. इतरांनाही पुढे येत शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन तिने केले आहे. काही दिवसांपूर्वी विद्या बालननेदेखी डॉक्टरांसाठी १ हजार पीपीई किट्सचे वाटप केले होते.