Join us  

दिलवाले नव्हे, बाजीराव पडला भारी

By admin | Published: December 22, 2015 12:52 AM

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला शाहरूख खान-काजोलचा ‘दिलवाले’ आणि संजय लीला भन्साळींचा ‘बाजीराव मस्तानी’ यांच्यातील स्पर्धेत कोणा एकाला जिंकल्याचा आनंद मिळवता आलेला नाही

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला शाहरूख खान-काजोलचा ‘दिलवाले’ आणि संजय लीला भन्साळींचा ‘बाजीराव मस्तानी’ यांच्यातील स्पर्धेत कोणा एकाला जिंकल्याचा आनंद मिळवता आलेला नाही; तथापि पहिल्या विकेंडचा विचार करता ही स्पर्धा बरोबरीची ठरली, असे म्हणता येईल. बाजीराव मस्तानीवरून जो काही वाद झाला त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत चुरशीची व उत्सुकता निर्माण करणारी ठरली. या दोन्ही चित्रपटांना विरोध झाला व त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर झाला हेही लक्षात घ्यावे लागेल. आधी व्यवसायाचा विचार केला तर प्रदर्शित झाला त्या पहिल्याच दिवशी शाहरूख खानच्या दिलवालेचे पारडे जड होते. त्याचे कारण होते ते हे की दिलवाले बाजीराव मस्तानीच्या तुलनेत जास्त चित्रपटगृहांत प्रदर्शित केला गेला होता. आकड्यांबद्दल बोलायचे तर बाजीराव मस्तानी जवळपास २५०० चित्रपटगृहांत तर दिलवाले ३२०० चित्रपटगृहांत दाखविण्यात आला. पहिल्या दिवशी दिलवालेचा गल्ला २१ कोटींचा तर बाजीरावचा १२.८० कोटींचा सांगण्यात आला. प्रसारमाध्यमांत या दोन्ही चित्रपटांबद्दल मिळत्याजुळत्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. प्रसारमाध्यमांनी परीक्षणांमध्ये दिलवालेच्या तुलनेत बाजीराव मस्तानीला पसंती दिली. प्रसारमाध्यमांशिवाय पहिल्या दिवशी चित्रपट बघणाऱ्यांच्या प्रतिक्रियांनी बाजीराव मस्तानीला झुकते माप दिले. याचा दुसरा परिणाम दुसऱ्याच दिवशी दिसू लागला होता. शनिवारी दिलवालेच्या गल्ल्यात पहिल्या दिवशीच्या गल्ल्याच्या तुलनेत १ कोटीची कमी होती व ती २० कोटींच्या जवळपास गेली. दुसरीकडे बाजीराव मस्तानीची कमाई वाढून १२ कोटींवरून १५ कोटींपर्यंत गेली. रविवारची स्पर्धा अधिक उत्सुकतावर्धक ठरली. रविवारी ‘दिलवाले’ने २४ कोटींची कमाई केली, तर बाजीराव मस्तानीची कमाई १८ कोटींपेक्षा जास्त झाली. त्यानुसार पहिल्या आठवडाअखेर ‘दिलवाले’ची कमाई ६५ कोटी आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटाची कमाई ४७ कोटी रुपये राहिली. ‘बाजीराव मस्तानी’या चित्रपटाच्या तुलनेत ‘दिलवाले’ची मजल-दरमजल पहिल्या आठवडाअखेरनंतर धीमी पडत चालली आहे. परिणामी, १०० कोटी क्लबच्या टप्प्यापासून हे दोन्ही चित्रपट मागे पडत चालल्याचे दिसते.विविध कारणांवरून या दोन्ही चित्रपटांच्या विरोधात विविध ठिकाणी निदर्शने झाली. बाजीराव.. चित्रपटाचा विरोध पुण्यापर्यंत मर्यादित राहिला. तथापि, दिलवालेच्या विरोधात राजस्थान, मध्य प्रदेशसह भाजपाशासित राज्यांत निदर्शने झाली. या विरोधामुळेच ‘दिलवाले’चे नुकसान झाल्याचे बोलले जाते. २०१५ या वर्षातील शेवटच्या शुक्रवारी एकही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने दिलवाले आणि बाजीराव मस्तानी या दोन चित्रपटांपैकी कोणाला फायदा होईल, हे यथावकाश कळेलच.