चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बनवलेल्या पोस्टरवर, इतर साधनांवर आत्तापर्यंत फक्त दिग्दर्शक, निर्माते, कलाकार यांची नावे झळकत होती. यापुढे कथा, पटकथा, संवाद लेखक आणि गीतकार यांची नावेही आता पोस्टरवर झळकणार आहेत. पोस्टरवर लेखक आणि गीतकारांची नावे दिसतील अशी लिहावीत असा नियम अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने शुक्रवारपासून लागू केला आहे.नवीन येणाऱ्या चित्रपटाची प्रसिद्धी करताना दिग्दर्शक, कलाकार, निर्माते हेच प्रकाशझोतात येतात. चित्रपटाची कथा लिहीणारा लेखक, पटकथाकार, संवाद लेखक आणि गीतकार यांचेही चित्रपटात मोठ्या प्रमाणात योगदान असते. नाटक आणि मालिकांच्या प्रसिद्धीत लेखकाचे नाव अग्रस्थानी असते. मात्र चित्रपट सुपर हिट होऊनही लेखकाचे नाव प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही. ‘मानाचि लेखक संघटने’ने या विषयाकडे महामंडळाचे लक्ष वेधले होते. संघटनेने जुलै महिन्यात आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या समारोप समारंभाच्यावेळी चित्रपटाच्या पोस्टरवर लेखकांचा नामोल्लेख टाळला जात असल्याची खंत व्यक्त केली होती. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी ही बाब लक्षात ठेवून महामंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय महामंडळाने लागू केला.
चित्रपटाच्या प्रसिद्धीत आता लेखक, गीतकारही झळकणार
By admin | Published: August 23, 2015 3:51 AM