तिरुवनंतपुरम – २०१९ मध्ये मिस केरळ बनलेली अंसी कबीर आणि मिस केरळ रनरअप असलेली डॉ. अंजना शजान या दोघींचा सोमवारी एका भीषण अपघातात मृत्यू झाला. एका टू व्हिलरला वाचवण्याच्या नादात गाडी रस्त्याकिनारी असलेल्या झाडाला आदळली. ही टक्कर इतकी भयानक होती ती कारचे तुकडे उडाले. या दुर्घटनेत दोघींचा मृत्यू झाला. कारमधील इतर २ जण गंभीर जखमी आहेत तर टू व्हिलर चालकही जखमी आहे.
पोलिसांनी या अपघाताची नोंद रॅश ड्रायव्हिंग केली आहे. अंसी कबीर ही २०१९ मध्ये मिस केरळा बनली होती. त्यानंतर २०२१ मध्ये ती मिस साउथ इंडिया बनली होती. अंसी तिरुवनंतपुरम येथे राहणारी होती. तर दुसरीकडे २०१९ मध्ये मिस केरळ रनरअप राहिलेली डॉ. अंजना शजान ही मॉडेलिंग करत होती. दोघींच्या अचानक झालेल्या मृत्यूनं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अंसी कबीर हिच्या मृत्यूनंतर आता तिची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. अंसी कबीरनं(Ansi Kabeer) अलीकडेच तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, आता जायची वेळ आली आहे. अंसीने हे बाहेर फिरण्याच्या हेतूने लिहिलं होतं. परंतु अंसीची ही अखेरची पोस्ट ठरेल असं स्वप्नातही कुणाला वाटलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अंसी आणि अंजना एका कारमधून तिरुवनंतपुरम येथून कोच्ची येथे एका प्रोजेक्टसाठी जात होत्या. त्यावेळी व्यटिला पलरिवट्टोम हायवेवर त्यांची गाडी एका टू व्हिलरचा धडकली तेव्हा कारवरचं नियंत्रण सुटून गाडी थेट एका झाडाला जोरात आदळली. या दुर्घटनेत कारचं प्रचंड नुकसान झाले. यावेळी गाडीत अंसी आणि अंजना यांच्यासह अन्य २ जण उपस्थित होते. या दोन्ही व्यक्तींना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अंसी आणि अंजना यांचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे.
अखेरच्या व्हिडीओत काय आहे?
अंसी कबीरच्या मृत्यूनंतर तिने इन्स्टाग्रामवर टाकलेली अखेरची पोस्ट खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती एका हिरवळ असलेल्या जंगलात फिरताना दिसते. या व्हिडीओच्या कॅप्शनला तिने जे वाक्य लिहिलं त्यामुळे ही पोस्ट सोशल मीडियात नेटिझन्सच्या चर्चेचा विषय बनली आहे. आता जायची वेळ आली असं तिने म्हटलं आहे. त्यानंतर ही भीषण दुर्घटना होऊन तिने या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे हा योगायोग सोशल मीडियात व्हायरल होत आहे.