ऑनलाइन लोकमत -
माद्रिद (स्पेन), दि. 24 - अभिनेता सलमान खानने केलेल्या बलात्काराच्या वक्तव्यानंतर सर्वांनीच त्याच्यावर जोरदार टीका केली होती. चित्रपटांमध्ये 'एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै अपने आप की भी नही सुनता' डायलॉग म्हणणारा सलमान या वादानंतर आता मला कमी बोलायला हवं असं म्हणत आहे. 'सध्या मी जे काही बोलत आहे त्याचा उलट अर्थ काढला जात आहे. त्यामुळे मला कमी बोलायला हवं', असं सलमाम खानने म्हटलं आहे.
आयफा अवॉर्डसाठी मुलाखत देताना सलमान खानने ही प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ‘मी जास्त वेळ नाही बोलणार. सध्या मी जेवढं कमी बोलेन तेच माझ्यासाठी चांगलं असेल.’ असं सलमान खान बोलला आहे. विशेष म्हणजे सलमान खानने आपल्या बलात्काराच्या वक्तव्या उल्लेख केला नाही वा त्यावर खेद व्यक्त करत माफीही मागितली नाही. बलात्काराच्या वक्तव्यावर सलमाननं जाहीर माफी मागावी अशी मागणी अनेक राजकीय पक्षांनी आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडून करण्यात आली आहे.
'सुलतान' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने स्वत:ची तुलना बलात्कार पिडीत महिलेशी केली होती.
मुलाखतीदरम्यान सलमानला 'सुलतान' चित्रपटात कुस्तीपटूची भुमिका निभावणं किती कठीण गेलं ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. 'सहा तास सलग शुटींग करताना अनेक वेळा मैदानावर उचलणं, आपटणं चालू असायचं. मला हे फारच कठीण गेलं. कारण 120 किलो वजनाच्या व्यक्तीला मला 10 वेळा आणि तेदेखील 10 वेगवेगळ्या अँगलने उचलावं लागायचं. त्याचप्रमाणे मलादेखील उचलून जमिनीवर आपटलं जायचं. ख-या खेळात अशाप्रकारे पुनरावृत्ती केली जात नाही. शूट संपल्यानंतर मी जेव्हा रिंगच्या बाहेर पडायचो तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेसारखं वाटायचं. मला सरळ चालणं शक्य व्हायचं नाही. काहीतरी खायचो आणि ट्रेनिंगसाठी जायचो' असं उत्तर सलमान खानने दिलं.
सलीम खान यांनी मागितली माफी
सलमान खानच्या या वक्तव्याबाबत त्याचे वडील व प्रख्यात लेखक सलीम खान यांनी ट्विटद्वारे माफी मागितली होती. ' सलमान जे काही बोलला, त्याने जे काही उदाहरण दिले हे चुकीचेच होते. मात्र, त्यामागचा त्याचा उद्देश वाईट नव्हता' असे ते म्हणाले.