चित्रपटापासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी ग्लॅमरला रामराम करून स्वत:साठी एक वेगळा मार्ग निवडला. हा मार्ग संन्यास आणि अध्यात्माचा मार्ग आहे. अशा स्टार्सच्या यादीत आता आणखी एक नाव सामील झालं आहे ते म्हणजे टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकार (Nupur Alankar). अभिनय जगतापासून दूर राहून नुपूर देवाच्या भक्तीत तल्लीन झाली आहे. नुपूरचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिला पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.
ग्लॅमरने भरलेल्या टीव्ही इंडस्ट्रीला कायमचा बाय बाय करणारी अभिनेत्री नुपूर अलंकारचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नुपूरचा नवा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये ती भगवान कृष्णाच्या भक्तीत पूर्णपणे तल्लीन झालेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नुपूर इतर कृष्ण भक्तांसोबत दिसत आहे. संसारिक मोहापासून नुपूरचं विभक्त होण्यामागे एक खास कारण आहे. असे सांगितले जाते की, लॉकडाऊनच्या काळात नुपूरची आई आजारी पडली होती. नुपूरकडे तिच्या आईच्या उपचारासाठी पैसे नव्हते, त्यानंतर तिने लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले.
पती, सासूच्या संमतीनंतर संसारातून संन्यास घेण्याचा घेतला निर्णय
लोकांनी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून तिला मदत केली, पण दुर्दैवाने ती आईला वाचवू शकली नाही. नुपूरचा सुरुवातीपासूनच आध्यात्मिक जीवनाकडे कल होता. या घटनेनंतर तिने आपले आयुष्य गरजूंना मदत करण्यात आणि अध्यात्मात घालवण्याचा निर्णय घेतला. नुपूरने 2002 मध्ये अलंकार श्रीवास्तवशी लग्न केलं. दोघेही बरेच दिवस वेगळे राहत होते आणि त्यांच्यात पती-पत्नीचं कोणतंही नातं नव्हतं. पती आणि सासूच्या संमतीनंतरच तिने संसारातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.
नुपूर जवळपास 27 वर्ष टीव्ही इंडस्ट्रीचा भाग होती
नुपूरने असेही सांगितले आहे की तिने अध्यात्माचा मार्ग अवलंबण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, नुपूरने मुंबईतलं तिचं घर भाड्याने दिलं आहे. नुपूर जवळपास 27 वर्ष टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग होती. याशिवाय ती सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनची (CINTA) सदस्यही होती. नुपूर अलंकारने 'शक्तिमान', 'घर की लक्ष्मी बेटियां', 'दिया और बाती हम' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे, याशिवाय 'राजाजी', 'सावरिया', 'सोनाली केबल' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"