Nusrat Jahan On Pathaan Controversy: शाहरूख खान व दीपिका पादुकोण यांच्या ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून सध्या वातावरण तापलं आहे. कारण आहे, या गाण्यात दीपिकाने घातलेली भगव्या रंगाची बिकिनी. दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचं काही लोकांचा आक्षेप आहे आणि यावरून अनेकांनी दीपिका व शाहरूखवर टीका चालवली आहे. अर्थात या सगळ्या वादात दीपिकाची बाजू घेणारेही काही जण आहेत. आता अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘बेशरम रंग’ गाण्याला विरोध करण्याचा परवाना कुण्याही राजकीय पक्षाला दिलेला नाही, अशी टीका करत नुसरत यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत नुसरत यावर बोलल्या.
काय म्हणाल्या नुसरत...‘त्यांना प्रत्येक गोष्टीवर आक्षेप आहे. त्यांना महिलांनी बिकिनी घातली तर आक्षेप असतो. महिलांनी बुरखा घातला तर त्यावरही त्यांना आक्षेप आहे. हेच लोक देशातील नवीन पिढीतील महिलांना त्यांनी काय घालायला हवं काय नाही, याचा सल्लाही देत आहेत. तुम्ही काय घालायला हवं? काय खायला हवं ? कसं चालायला हवं? शाळांत काय शिकवायला हवं? टीव्हीवर काय बघायला हवं? हे सगळं ही सांगत सत्ताधारी आपल्या प्रत्येकाचं आयुष्य नियंत्रित करू बघत आहेत. तथाकथिक नवीन विकसीत भारतात अशा पद्धतीनं हुकूमशाही निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरंच हे खूपच भयानक आहे. हे असंच सुरू राहिलं तर येणारा काळ आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे, याची मला भिती वाटत आहे,’असं नुसरत म्हणाल्या.