बॉलिवूडचा गली बॉय म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. 'गली बॉय', 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी', 'रामलीला' या चित्रपटातील भूमिकेतून त्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नेहमी भूमिकांमुळे व त्याच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे तो चर्चेत येत असतो. मात्र यावेळेस तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
डेक्कन क्रोनिकलच्या वृत्तानुसार,'रणवीरला आपल्या चाहत्यांशी संवाद साधायला नेहमीच आवडते. त्यामुळे आता चाहत्यांना वेगळ्या प्रकारे उत्तर देण्यासाठी रणवीरने स्वत:चे स्टिकर्स आणि GIFs तयार करून घेतले आहेत. हे स्टिकर्स केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील त्याच्या चाहत्यांना वापरता येणार असल्याचे समजते आहे.'
रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी चित्रपट '८३' मध्ये बिझी आहे. या चित्रपटात रणवीर भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार कपिल देव याची भूमिका साकारताना दिसणार आहे.
कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे.
१९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. सिनेमाच्या शूटिंग आधी कलाकारांसाठी मोहालीमध्ये एक बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
एप्रिलमध्ये होणारे हे बूट कॅम्प जवळपास पंधरा दिवस चालणार आहे. यात कपिल देव, यशपाल शर्मा, मदन लाल आणि अन्य क्रिकेटर सहभागी होणार आहेत. या कॅम्पमध्ये क्रिकेटर्स सिनेमातील कलाकारांना क्रिकेट शिकवणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२०ला प्रदर्शित होणार आहे.