Join us  

आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारा ओके जानू

By admin | Published: January 14, 2017 6:39 AM

ओके जानू हा ‘ओ कढाल कनमाई’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी केले

ओके जानू हा ‘ओ कढाल कनमाई’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी केले होते. या सुपरहिट चित्रपटाचा ओके जानू रिमेक असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि त्यातच या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अलीने केले आहे. शादने दिग्दर्शित केलेल्या साथिया या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगलीच कमाई केली होती. साथियातील विवेक ओबेरॉय आणि राणी मुखर्जीची प्रेमकथादेखील प्रेक्षकांना आवडली होती. ओके जानूमध्येदेखील आपल्याला एक प्रेमकथा पाहायला मिळते.लग्न की करिअर या द्विधा मनस्थितीत सध्याची पिढी अडकलेली आहे. त्यामुळेच नात्यात कोणत्याही प्रकारची कमिटमेंट द्यायची त्यांची तयारी नसते. भावनिकरीत्या ते एकमेकांशी जोडलेले असले तरी नात्यात अडकल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या त्यांना नकोशा असतात. अशीच आजच्या पिढीची कथा सांगणारा चित्रपट म्हणजे ओके जानू.आदी (आदित्य रॉय कपूर) आणि तारा (श्रद्धा कपूर) आपल्या करिअरच्या मागे धावत असतात. अचानक एका मैत्रिणीच्या लग्नात त्यांची भेट होते आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असले तरीही ते लग्न करायला तयार नसतात. आदी हा व्हिडीओ गेम डेव्हलप करणारा असतो. त्याला त्याच्या करिअरसाठी अमेरिकेला जायचे असते, तर तारा एक आर्किटेक्ट असते. तिला पुढील शिक्षणासाठी पॅरिसला जायचे असते. करिअरच्या मध्ये लग्नाचा अडथळा नको असे त्यांना वाटत असते. त्यामुळे ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागतात. पण ते दोघे एकमेकांसोबत राहत असले तरी करिअरच्या संधी चालून आल्या तर एकमेकांना थांबवायचे नाही असेही ते ठरवतात आणि काही काळानंतर त्या दोघांनाही करिअरच्या चांगल्या आॅफर्स येतात आणि त्यातून ते काय निर्णय घेतात हे चित्रपटाच्या उत्तरार्धातच उलगडते. ओके जानू या चित्रपटाची कथा ही आजच्या पिढीची असल्याने ती रोजच्या जीवनातीलच वाटते. त्यांचे वागणे, त्यांचे जगणे हे आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करते. चित्रपटाची प्रेमकथा ही आपण आतापर्यंतच्या अनेक चित्रपटांत पाहिलेली आहे. पण चित्रपटाचा शेवट दिग्दर्शकाने एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवला आहे. चित्रपटाचा वेग प्रचंड संथ आहे. कथानकाला शेवटपर्यंत काहीच वेग नसल्याने अनेक वेळा चित्रपट पाहताना तो कंटाळवाणा वाटतो. पण चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे एका वृद्ध जोडप्याची प्रेमकथा. आदी ज्यांच्या घरात राहत असतो त्या उतारवयातील जोडप्याची केमिस्ट्री ही खूपच छान दाखवली आहे. या उतारवयातील जोडप्याची भूमिका नसीरुद्धीन शाह आणि लीला सॅमसन यांनी साकारली आहे. आदी आणि ताराच्या प्रेमकथेपेक्षा या उतारवयातील जोडप्याची कथा मनाला अधिक भावते. आदित्य आणि श्रद्धाने भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. पण नसीरुद्दीन शाह आणि लीला सॅमसन या चित्रपटात सगळा भाव खाऊन जातात. आशिकी 2 या चित्रपटात प्रेक्षकांना आदित्य आणि श्रद्धाची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. ओके जानूमध्येदेखील त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. या चित्रपटाची गाणी गुलजार यांनी लिहिली असून संगीत ए.आर. रहमानचे आहे. त्यामुळे या चित्रपटाची सगळीच गाणी खूप चांगली आहेत. हम्मा हम्मा हे गाणे चांगल्याप्रकारे चित्रित केले आहे.-प्राजक्ता चिटणीस