सामाजिक वास्तव रुपेरी पडद्यावर आणणारे दिग्दर्शक म्हणून मधुर भंडारकर यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. चांदणी बार, पेज-थ्री, फॅशन आणि हीरोइन यासारख्या चित्रपटात त्यांनी समाजातील वास्तव दाखविताना अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडींचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. ‘कॅलेंडर गर्ल्स’ या चित्रपटातही त्यांनी या सर्वांची सरमिसळ करून ग्लॅमर, मॉडेलिंग आणि बॉलीवूडच्या दुनियेतील वास्तव दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.लाहोर, हैदराबाद, हरियाणा, कोलकाता आणि गोव्यातील पाच मुलींची ही कहाणी. नाजनीन (अवनी मोदी), नंदिता मेनन (आकांक्षा पुरी), मयूरी चौहान (रुही सिंह), पारोमिता घोष (सतपुरा पायन) आणि शेरॉन पिंटो (कायरा दत्त) या पाच जणींना एका ग्लॅमर कॅलेंडरसाठी मॉडेल होण्याची संधी मिळते. नंतर त्यांनाही मोहक दुनियेची स्वप्ने पडू लागतात. मयूरी हीरोइनसाठी प्रयत्न करते, तर शेरॉन मॉडेलिंगमध्ये नाव कमावण्याचे ठरवते. नाजनीनची बॉलीवूडमध्ये नशीब अजमावण्याची इच्छा असते. नंदिता मात्र राजस्थानच्या राजकुमारसोबत संसार थाटते. तथापि, तिचा पती बाहेरख्याली असल्याचे तिला कळते. पारोमिताचा प्रियकर तिला सट्टेबाजीने ग्रासलेल्या आयपीएल क्रिकेटच्या दुनियेत नेतो. बॉलीवूडमध्ये यश न मिळाल्याने नाजनीन कॉलगर्ल होते. मयूरी मात्र छोट्या भूमिकांतून मोठा चित्रपट मिळविण्यासाठी प्रयत्न करते, तर शेरॉन मॉडेलिंग सोडून न्यूज चॅनेलमध्ये अँकरची होते. चकमकत्या दुनियेतील वास्तव किती भयानक आहे, हे या पाच मुलींच्या अनुभवातून पुढे येते.का पाहावा ? ग्लॅमर दुनियेचे आकर्षण असलेले चाहते खूश होतील.का पाहू नये ? मधुर भंडारकर यांच्या चाहत्यांसाठी यात नवीन काहीच नाही.-----वैशिष्ट्ये : आयपीएलमधील सट्टेबाजी ते मॉडेलिंगच्या दुनियेतील काही घटना शहरी प्रेक्षकांना पसंत पडतील. मसालेदार चित्रपटांच्या चाहत्यांसाठी यात भरपूर मसाला आहे. विदेशी स्थळांचा वापर मात्र चांगला करण्यात आलेला आहे.उणिवा : यावेळी मधुर भंडारकर यांनी फारसे काही केले नाही. ग्लॅमरशी संबंधित मागच्या चित्रपटातील मसाल्याची सरमिसळ करून कथानक तयार करण्यात आले आहे. तसेच आयपीएल, न्यूज चॅनेल आणि बॉलीवूडचा खरा चेहरा उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. कथानकात नावीन्य नाही. मागच्या चित्रपटांतील दृश्यांची पेरणी करण्यात आली असून, सर्व पात्रांची गुंफण एकाच धाटणीने करण्यात आली आहे. ग्लॅमरच्या दुनियेचा पर्दाफाश करण्यात आलेला असला तरी तो न्यायसंगत वाटत नाही. नवीन करण्यात दिग्दर्शक म्हणून भंडारकर अपयशी ठरले आहेत. या पाच मुलींची भूमिका करणाऱ्यांपैकी एकही भविष्यात अभिनेत्री म्हणून पुढे येण्याची शक्यता दिसत नाही. किरण कुमार, रोहित रॉय यांची भूमिका सुमार आहे. गीत-संगीतच्या बाबतीतही फारसे काही नाही. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट कमकुवत आहे.
जुन्या चित्रपटांची भेसळ
By admin | Published: September 26, 2015 10:22 PM