Join us

ओम पुरी यांनी त्यांच्या निधनाविषयी केले होते हे भाकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 6:56 PM

ओम पुरी यांना बहुदा त्यांच्या मृत्यूची चाहुल खूप आधी लागली होती. कारण त्यांचे निधन कशाप्रकारे होईल असे त्यांनी एका मुलाखतीत काही वर्षांपूर्वीच सांगितले होते.

ठळक मुद्दे२०१५ मध्ये बीबीसीला दिलल्या मुलाखतीत माझे निधन अचानक होणार असे त्यांनी सांगितले होते

ओम पुरी यांनी त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक प्रस्थ निर्माण केले होते. या दिग्गज अभिनेत्याचे निधन ६ जानेवारी २०१७ ला झाले. ओम पुरी यांचा जन्म एका पंजाबी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील रेल्वेत नोकरी करायचे. ओम पुरी यांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड सघर्ष केला. त्यांनीच अनेक मुलाखतींमध्ये याविषयी सांगितले होते. 

ओम पुरी यांनी सांगितले होते की, मी केवळ सहा वर्षांचा असताना चहाच्या स्टॉलवर काम करायचो. पण मला अभिनयाची आवड असल्याने मी मेहनत करत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. अभिनयाचे शिक्षण घेतल्यानंतर मी बॉलिवूडकडे वळलो. 

तुम्हाला माहीत आहे का, ओम पुरी यांनी बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला असला तरी त्यांनी त्यांच्या अभिनयकारकिर्दीची सुरुवात एका मराठी चित्रपटापासून केली. घासीराम कोतवाल हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी अर्ध सत्य या हिंदी चित्रपटात काम केले. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले. आक्रोश, अर्धसत्य, घायल, चाची ४२०, मकबूल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या. तसेच त्यांनी जॉय, वुल्फ, द घोस्ट एंड द डार्कनेस यांसारख्या इंग्रजी चित्रपटांमध्ये देखील काम केले.

ओम पुरी यांना बहुदा त्यांच्या मृत्यूची चाहुल खूप आधी लागली होती असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण २०१५ मध्ये बीबीसीला दिलल्या मुलाखतीत माझे निधन अचानक होणार असे त्यांनी सांगितले होते आणि खरंच अशाप्रकारेच अचानक त्यांचे निधन झाले. ओम पुरी यांचे ड्रायव्हर राम प्रमोद मिश्रा यांनी सगळ्यात पहिल्यांदा ओम पुरी यांना मृतावस्थेत पाहिले होते. पोलिसांनी दिलेल्या जबाबात त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या अंगावर कोणतेच वस्त्र नव्हते आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. काही लोकांच्या मदतीने मी त्यांना रुग्णालयात नेले होते. ओम पुरी यांच्या डोक्याला खोल जखम झाली होती असे त्यांच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये आले होते. 

टॅग्स :ओम पुरी