Join us

Adipurush Controversy : ट्रोलिंग चुकीचं कारण तुम्ही फक्त...., ‘आदिपुरुष’च्या ट्रोलिंगबाबत दिग्दर्शक ओम राऊत स्पष्टच बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 11:25 AM

Adipurush Controversy, Om Raut : ‘आदिपुरूष’ या आगामी चित्रपटावर सध्या सडकून टीका होतेय. या निगेटीव्ह फिडबॅकवर आता ‘आदिपुरूष’चा दिग्दर्शक ओम राऊत याने चुप्पी तोडली आहे.

दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) याने दिग्दर्शित केलेल्या ‘आदिपुरूष’ (Adipurush ) या आगामी चित्रपटावर सध्या सडकून टीका होतेय. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि तो पाहून सोशल मीडियावर हा सिनेमा जबरदस्त ट्रोल झाला. चित्रपटातील व्हिएफएक्स सीन्स आणि कलाकारांचा लुक लोकांच्या पचनी पडला नाही. विशेषत: चित्रपटातील सैफ अली खानचा रावणाच्या भूमिकेतील अवतार पाहून  नेटकऱ्यांनी या चित्रपटाची जोरदार खिल्ली उडवली. अगदी ‘आदिपुरूष’मधील रावणाची  तुलना ‘पद्मावत’ चित्रपटातील खिल्जीशी केली गेली. अनेकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची, त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणीही पुढे रेटली. आता या निगेटीव्ह फिडबॅकवर ‘आदिपुरूष’चा दिग्दर्शक ओम राऊत याने चुप्पी तोडली आहे. चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नसल्याचं त्याने रेटून सांगितलं आहे.

काय म्हणाला ओम राऊत?इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ओम राऊत ‘आदिपुरूष’बद्दल बोलला. आमच्या चित्रपटात काहीही गैर नाही.  आम्ही काहीही चुकीचं दाखवलेलं नाही. नवीन पिढीपर्यंत श्रीराम यांची गोष्ट, त्यांचे विचार  पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि नवीन पिढीपर्यत प्रभु श्रीराम यांचे विचार पोहोचवायचे असतील तर  आपल्यालाही नवीन टेक्नोलॉजीचा वापर करून चित्रपटाची निर्मिती करणं भागं आहे.  आम्ही चित्रपटात काहीही चुकीचं दाखवलेलं नाही. प्रत्येक गोष्टीचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला आहे, असं ओम राऊत म्हणाला.

मी रावणाला तसं बघत नाही...चित्रपटातील रावण या पात्राच्या लूकमागील भूमिकाही ओम राऊतने स्पष्ट केली. रावणाला लोक कोणत्या नजरेतून बघतात, यावर सगळं अवलंबून आहे. लोकांसाठी रावण अद्यापही राक्षस आहे. परंतु, मी एका वेगळ्या नजरेतून त्याच्याकडे बघतो. मी कल्पना केलेल्या रावणाला मोठी मिशी नाही. ज्या रावणाला लोकांनी आधी पाहिलं, तसा रावण मी दाखवलेला नाही. पण यामुळे मी रावणाचं रंग आणि रुप मी बदललं असल्याचं तुम्ही म्हणत असाल तर ते चुकीचं आहे. कारण हा तोच रावण आहे. हा तोच रंग आहे. हा धर्माचा रंग आहे, असं तो म्हणाला. 

मी निराश करणार नाही...पुष्पक विमान बदलल्याच्या आरोपांनाही ओम राऊतने उत्तर दिलं. टीझरमध्ये दाखवलेलं ते पुष्पक विमान आहे, हे कुणी सांगितलं? आम्ही फक्त आमच्या चित्रपटातील 95 सेकंदांचा भाग तुम्हाला दाखवला आहे. त्यावरून निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. चित्रपटाचा टीझर पाहून लोकांनी निगेटीव्ह कमेंट्स दिल्यात. आम्ही त्यावर गंभीरपणे विचार करू. पण आम्ही चित्रपटात काहीही बदल करणार नाही. जानेवारीत हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा मी कोणालाही निराश करणार नाही, असंही त्याने स्पष्ट केलं.

‘आदिपुरुष’ चित्रपटात साऊथ सुपरस्टार प्रभास लीड रोलमध्ये आहे. त्याच्याशिवाय सैफ अली खान,  अभिनेत्री क्रिती सनॉन, अभिनेता देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहांत धडकणार आहे. 

टॅग्स :आदिपुरूषप्रभाससैफ अली खान बॉलिवूड