बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी 'OMG 2'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाचा पहिला भाग प्रचंड गाजला होता. फिल्मची कथा प्रेक्षकांना आवडली होती. आता दुसऱ्या भागाकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत. यामध्ये अक्षय भोलेनाथच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र आता ट्रेलरमधील एका सीनवरुन काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. रेल्वेच्या पाण्याने भोलेनाथला अभिषेक केला गेल्याचं दाखवण्यात आलंय. यावरच आपत्ती दर्शवण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डानेही यावेळी विशेष काळजी घेत अहवाल सुधारित समितीकडे पाठवला आहे.
'आदिपुरुष' सिनेमानंतर ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप झाले, टीकाटिप्पणी झाली यावरुन सेन्सॉर बोर्ड आता दक्ष झालं आहे. 'ओह माय गॉड 2' चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याआधी त्याचा अहवाल सुधारित समितीकडे पाठवला आहे. चित्रपटातील संवाद आणि सीन्सवर विवाद होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. देव आणि धर्माशी निगडित विषय असेल तर त्याचा अहवाल सेन्सॉर बोर्डाकडून सुधारित समितीकडे पाठवण्यात आला आहे. यावर कमिटी लवकरच निर्णय घेईल.
'ओएमजी 2' मध्ये पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी एकत्र काम करत आहेत. यामी गौतमही सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. वेगळं कथानक आणि उत्तम स्टारकास्टमुळे सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी आशा आहे. टीझर सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि प्रेक्षकांच्या आवडतोय. सिनेमात 'रामायण' फेम अरुण गोविल श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांना पुन्हा श्रीरामाच्या भूमिकेत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. अमित राय यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.