मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद (Mi Honar Superstar Chhote Ustad) या कार्यक्रमाचं तिसरं पर्व १३ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. पहिल्या पर्वातही सिद्धार्थने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. आता तिसऱ्या पर्वात पुन्हा एकदा ही जबाबदारी नव्याने पेलण्यासाठी सिद्धार्थ सज्ज आहे. यंदाच्या पर्वात सिद्धार्थचा सिद्धांतही पाहायला मिळेल.
सिद्धार्थ चांदेकरसाठी मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद हा कार्यक्रम खूप खास आहे. याबद्दल सिद्धार्थ म्हणाला,पहिले पर्व जेव्हा मी केले तेव्हा सगळ्या छोटया उस्तादांच्या आणि परिक्षकांच्या मी प्रेमात पडलो. परिक्षक ज्याप्रकारे काळजीने त्या लहान मुलांशी बोलतात, चांगल्या गोष्टी समजावून सांगतात तेव्हा खरंच असं वाटतं की हे फक्त टीव्ही शोजचे जज नाही तर खरच गुरु आहेत. ज्यांचा अनुभव आणि ज्ञान खूप मोलाचे आहे. कार्यक्रमात कुठेही औपचारिकता नाही. आमचं छान कुटुंब तयार झाले आहे. या मंचावर संपूर्णपणे मराठी गाणी ऐकायला मिळतात.
पुढे अभिनेता म्हणाला की, स्पर्धक मंचावर अशी गाणी सादर करतात जी त्यांच्या जन्माच्या कित्येक वर्ष आधी आली असतील. तरीसुद्धा त्यांच्या तोंडपाठ आहेत. ही जुनी नवी सगळी गाणी या लहान मुलांकडून जर का नव्या पीढीपर्यंत पोहोचणार असतील तर याहून चांगली गोष्ट नाही. सूत्रसंचालक म्हणून माझं काम हेच आहे की सगळ्या छोट्या उस्तादांचा मोठा भाऊ व्हायचं. सोबतीला माझे सिद्धांत पण असतीलच. जेव्हा जेव्हा टेन्शनचं वातवरण असेल तेव्हा माझे सिद्धांत येतील आणि माहोल हलकाफुलका करतील. गाण्यासोबतच खूप सारी धमाल या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व तिसरे १३ जूलैपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.