गेल्या काही महिन्यांत बॉलिवूडने अनेक दिग्गज कलाकार गमावले. इरफान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंग राजपूत या दिग्गजांच्या निधनाच्या दु:खातून अद्यापही चाहते सावरलेले नाहीत. आता बॉलिवूडने आणखी एक दिग्गज गमावला आहे. बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन झाले आहे. ते दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. शनिवारी जयपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मुंबईत वास्तव्यास असणारे रजत मुखर्जी लॉकडाऊन काळात त्यांच्या शहरात जयपूरमध्ये होते. दीर्घकाळापासून ते किडनीच्या समस्येला तोंड देत होते.
अभिनेता मनोज वाजपेयीने ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘माझे मित्र आणि रोड या सिनेमाचा दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे जयपूरमध्ये निधन झाले. तुझ्या आत्म्यास शांती लाभो... आता आपण कधीच भेटू शकणार नाही, पुन्हा कधीच एकत्र काम करू शकणार नाही, यावर अद्यापही विश्वास बसत नाहीये, जिथे आहेस, तिथे आनंदी राहा,’असे ट्वीट मनोज वाजपेयीने केले आहे.
दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनीही रजत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘एक आणखी चांगला मित्र इतक्या लवकर सोडून गेला,’ असे त्यांनी लिहिले.
प्यार तूने क्या किया,रोड ,उम्मीद , लव इन नेपाल अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. 2002 साली रिलीज झालेल्या ‘रोड’ या रजत यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमात विवेक ओबेरॉय आणि अंतरा माळी मुख्य भूमिकेत होते. 2001 मध्ये त्यांचा उर्मिला मातोंडकर, फरदीन खान आणि सोनाली कुलकर्णी स्टारर ‘प्यार तूने क्या किया’ या सिनेमा प्रदर्शित झाला होता. काही दिवसात नवीन सीरिज देखील प्रेक्षकांसाठी घेऊन येणार होते.