'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम कलाकार ओंकार राऊत (Onkar Raut) नुकताच परदेश दौरा करुन आला. हास्यजत्रेची टीम लंडनला गेली होती. तिथे त्यांचे प्रयोग होते. कालच नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. हास्यजत्रेचे कलाकार नोव्हेंबरमध्ये लंडनमध्ये असताना त्यांनी तिथे ख्रिसमस डेकोरेशनजवळ फोटो काढले होते. ओंकार राऊतने काल हे फोटो पोस्ट केले. यावर एकाने कमेंट करत त्याला आपल्या सणांचेही फोटो पोस्ट करत जा असा उपदेश केला. यावर ओंकारनेही सडेतोड उत्तर दिलं आहे.
२५ डिसेंबर नाताळच्या सणानिमित्त सगळीकडे उत्साह दिसून येतो. ख्रिसमस ट्री, त्यावरची सुंदर सजावट, सगळीकडे लायटिंग आणि भरपूर गिफ्ट्स असा सगळा माहोल असतो. पण अनेक जण हा सण साजरा केलेल्यांना ट्रोलही करतात. ओंकार राऊतच्या फोटोवर एकाने कमेंट करत लिहिले, 'कधी आपल्या सणांचे पोस्ट टाकलास का भावा?' यावर ओंकारने रोखठोक उत्तर देत लिहिले, "हो रे! मी जे सण साजरे करतो त्याचे फोटो कधी पोस्ट करतो कधी नाही! मुळात सण हा आनंद पसरवतो त्यात हा सण आपला तो सण त्यांचा अशी घाणेरडी वृत्ती नको. लहानपणापासून मी गणपतीत मोदक खाल्ले आहेत, दिवाळीत फराळ, होळीला पुरणपोळी, ख्रिसमसला सांताकडून येणाऱ्या गिफ्ट्सची वाट बघितली आहे. ईदला माहिमला जाऊन मालपोवा खाल्ला आहे. खूप प्रसन्नतेने गुढीपाडवाही साजरा केलाय आणि त्याच उत्साहात ३१ डिसेंबर ही करतो!! म्हणून हे असले प्रश्न परत कोणालाही विचारू नकोस. Merry Christmas! सांता तुला गिफ्ट म्हणून सुविचार देवो."
ओंकार राऊतने दिलेल्या या उत्तराला बरेच लाईक्सही मिळाले आहेत. ओंकार राऊत मूळचा मुंबईचाच आहे. रुपारेल कॉलेजमध्ये शिकला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये त्याच्या स्किटची नेहमीच चर्चा असते.