२०१६ चे पहिले सत्र बॉक्स आॅफिससाठी तसे वाईटच गेले. या सत्रात जवळपास ९० हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आणि यापैकी फक्त १३ चित्रपट यशस्वी झाले. त्यापैकीसुद्धा गुंतवणूक आणि त्यावरील नफा हे पाहिले तर फक्त सोनम कपूरचा नीरजा हा चित्रपट सुपरहिट या सदरात मोडतो. चित्रपटाची प्रदर्शित होण्यापर्यंतची गुंतवणूक २० कोटींच्या जवळपास होती आणि चित्रपटाने ७५ कोटींपेक्षा जास्त धंदा केला. गुंतवणूक आणि नफा या प्रमाणावर दुसऱ्या नंबरवर करण जोहर निर्मित आणि शकून बात्रा दिग्दर्शित कपूर अँड सन्स या चित्रपटाचा नंबर लागतो. सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट ही हिट जोडी असलेल्या चित्रपटाने ७३ कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाची गुंतवणूक ३० कोटींच्या आसपास होती. तिसऱ्या नंबरवर टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरचा बागी हा चित्रपट आहे. या चित्रपटानेसुद्धा ७५ कोटींच्या आसपास गल्ला जमविला. या चित्रपटाची गुंतवणूकसुद्धा ३० कोटींच्या आसपास होती. हा चित्रपट सैराटसोबत प्रदर्शित झाला होता आणि महाराष्ट्रात याला सैराटच्या झंझावाताचा जबर फटका बसला. अर्जुन कपूर आणि करीना कपूर या जोडीच्या कि अॅण्ड का या चित्रपटाने ५० कोटींच्या वर गल्ला जमविला. एअरलिफ्ट हा अक्षयकुमारच्या कारकिर्दीतला एक अतिशय चांगला चित्रपट आहे. या चित्रपटाने १२५ कोटींचा गल्ला जमविला. याची गुंतवणूक ९० कोटींच्या आसपास होती, अक्षय कुमारच्या हाउसफुल ३ या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाची गुंतवणूक ही ९० कोटींच्या आसपास होती. उडता पंजाब या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती, त्याचा चित्रपटाला फायदा झाला. चित्रपटावरील गुंतवणूक ३५ कोटींच्या जवळपास होती आणि चित्रपटाने ५५ कोटींच्या वर व्यवसाय केला. यशराज फिल्म्स आणि शाहरूख खान ही हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी निर्माते आणि कलाकार जोडी, परंतु या जोडीच्या फॅन या चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही. चित्रपटाने ८५ कोटींच्या आसपास धंदा केला. गेल्या कित्येक वर्षांत शाहरूख खानचा चित्रपट म्हटला की तो १०० कोटींचा आकडा पार करतो असे समीकरण आहे. पण या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला नाही. वजीर या चित्रपटाने केवळ ४२ कोटीच कमवले. घायल वन्स अगेनने ४० कोटींचा आकडा पार केला तर जय गंगाजलने ३२ कोटी, सनम रेने २७ कोटी आणि हिमेश रेशमियाच्या तेरा सुरुरने २० कोटींचा गल्ला जमविला.मराठीमध्ये 60 पैकी 3 चित्रपट यशस्वीमराठी चित्रपटांच्या बाबतीत म्हणावयाचे तर ६० मराठी चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी फक्त ३ चित्रपट यशस्वी ठरले, यात झी स्टुडिओच्या नटरंगने ४० कोटींच्या वर रेकॉर्ड ब्रेक व्यवसाय केला तर झी स्टुडिओच्याच सैराटने ९० कोटींचा आकडा पार करून इतिहास घडविला. वायकॉमच्या पोस्टर गर्ल चित्रपटाने ४ कोटींच्या वर गल्ला जमविला. इतर ५७ मराठी चित्रपटांची पार वाताहत झाली.
- एन.पी. यादव, ट्रेड अॅनालिस्ट