आपल्या देशाचे सुरक्षा करणारे जवान, पोलीस हेच आपले खरे हिरो आहेत. आम्ही फक्त सिनेमातील हिरो आहोत, असे अभिनेता जॉन अब्राहमने म्हटले आहे. जॉनने फोर्स-टू या सिनेमात एका प्रामाणिक एसीपीची भूमिका साकारली आहे. याच निमित्ताने जॉनशी साधलेला हा संवाद... 'फोर्स' सिनेमा रसिकांना भावला होता. फोर्स आणि फोर्स-2 या दोन्ही सिनेमांच्या कथांमध्ये काय वेगळेपण आहे?-फोर्स-2 हा सिनेमा फोर्स सिनेमापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. फोर्स सिनेमात एसीपी यशवर्धनच्या पत्नीचे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे निधन होते. मात्र, तरीही प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडण्याचे काम एसीपी यशवर्धन सोडत नाही. त्याच दरम्यान एसीपी यशवर्धनला एका मिशनवर जावे लागते. मात्र, प्रशिक्षित नसल्याचे सांगत रॉ प्रमुख त्याला रोखतात. रॉ एजंट प्रमुखाची भूमिका के. के.ने साकारली असून, इथूनच फोर्स-टू सिनेमाला सुरुवात होते.आजच्या जगात प्रामाणिकपणाचे काय महत्त्व आहे का ?-आपले पोलीस आणि पोलीस दल प्रामाणिक आहे. सध्याच्या युगात प्रामाणिकपणा अनमोल आहे. आता नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. जे प्रामाणिक आहे त्यांना कसलीच भीती नाही. ते शांतपणे रात्री झोपू शकतात. मात्र जे काळा पैसा जमवतात, भ्रष्टाचार करतात त्यांची काही खैर नाही. प्रामाणिकपणाच आपल्याला यशोशिखरावर नेते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तुझा प्रत्येक सिनेमा अॅक्शन स्पेशल असतो. तर या सिनेमातील अॅक्शनबद्दल काय सांगशील?-या सिनेमातील एक्शन तुम्ही याआधी कोणत्याही हिंदी सिनेमात पाहिली नसेल. या सिनेमासाठी तीन-तीन अॅक्शन दिग्दर्शक आहेत. त्यातील दोन अॅक्शन दिग्दर्शक आंतरराष्ट्रीय आहेत. त्यामुळे या सिनेमातील अॅक्शन सीन वेगळे आणि खास आहेत. तसेच सिनेमाची कथाही तितकीच खास आहे. या सिनेमातील पोलीस अधिकाऱ्यासाठी त्याला देश आणि त्याची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. या सिनेमात एक डायलॉग आहे. ज्यात रॉ प्रमुख बोलतो की 'हम ऐसे घुसके किसी को मार नहीं सकते'. यावर मी त्याला उत्तर देतो की 'सर देश बदल गया है, हम कहीं भी घुसकर मार सकते है'.या सिनेमात अॅक्शन करताना तू जखमी झाला होतास. तर अॅक्शन सीन करताना काय खबरदारी घेणे गरजेचे आहे?-या सिनेमातील स्टंट करतानाच नाही तर कोणताही स्टंट करताना सुरक्षेची काळजी घेतो. तशीच सुरक्षा या सिनेमातील स्टंट करतानाही घेतली होती. मात्र, कधी कधी सुरक्षेसाठी लावलेले पॅडिंग घसरतात. तसाच काहीसा प्रकार माझ्याबाबतीतही घडला. याबद्दल जास्त विचार करून फायदा नाही; कारण हा केवळ नशिबाचा भाग असतो, असे मला वाटते. मी ७०-८० वर्षांचा झालो तरी मला स्टंट करायला आवडेल. कारण स्टंट करणे मला आवडते. स्टंट करताना मी स्वत:चीच काळजी घेतो असे नाही, तर माझ्या सहकलाकारांचीही सुरक्षा माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. फोर्स टू सिनेमात सोनाक्षी असो किंवा 'ढिश्शूम' सिनेमाच्या वेळी वरुण धवन असो. दोघांच्याही स्टंटच्या आधी सुरक्षेची काळजी घेतली गेली की नाही याची मी स्वत: शहानिशा करायचो. जेव्हा मला वाटले सगळे व्यवस्थित आहे तेव्हाच तो स्टंट केला. कारण सुरक्षेची काळजी हाच सर्वोत्तम उपाय आहे, असे मला वाटते. अॅक्शन सीन किंवा दुखापतीबाबत तुझा एखादा आठवणीतील किस्सा?-'ऐतबार' हा माझा पहिला सिनेमा होता. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा होते. या सिनेमातील एका सीनच्या शूटिंगसाठी मी फ्रॅक्चर हाताने पोहोचलो होतो. त्यावेळी मला सांगण्यात आले होते की तुझ्या हातापेक्षा डेट महत्त्वाची आहे. त्याचा मी आदर केला आणि दिलेल्या वेळेत तो सीन पूर्ण केला. त्यावेळी कितीही त्रास होतो, दुखणे होते तरी तो सीन पूर्ण करणे महत्त्वाचे होते ते मी केले. कदाचित बच्चन साहेबांनाही हे माहिती नसेल. तुझ्या मते देशाचे खरे हिरो कोण ?-माझ्या मते देशाचे रक्षण करणारे जवान माझ्यासाठी देशाचे खरे हिरो आहेत. जॉन अब्राहम, सोनाक्षी सिन्हा किंवा ताहिर भसीन हे फक्त सिनेमातील हिरो आहेत. मात्र, सीमेवर लढणारे आपले जवानच खरेखुरे हिरो आहेत.
‘देशाचे जवान हेच खरे हिरो’
By admin | Published: November 18, 2016 4:58 AM