ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - बालगंधर्व, दिनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर आणि पृथ्वीराज कपूर यांनी बहराच्या काळामध्ये जिथे आपली कला सादर केली, ते गिरगावमधील ऐतिहासिक 'ऑपेरा हाऊस' रसिकांसाठी पुन्हा खुले होत आहे. केवळ मुंबईकरांच्या नाही तर देशाच्या सांस्कृतिक इतिहासाचा जिव्हाळ्याचा विषय असलेले ब्रिटीश कालीन ऐतिहासिक थिएटर 'ऑपेरा हाऊस' तब्बल 23 वर्षांनंतर मुंबईकरांसाठी खुले करण्यात येणार आहे. 23 वर्षांनंतर हे थिएटर पुन्हा हाऊस फुल्ल होणार आहे. 1993 साली 80 वर्षांचा वैभवशाली इतिहास असलेले हे थिएटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता अगदी आकर्षक अशा नव्या रुपात, नव्या ढंगात ऑपेरा हाऊस थिएटर मुंबईकरांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे.
गुरुवारी (20 ऑक्टोबर) मामि फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यावेळी हे थिएटर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार आहे. आकर्षक आणि अनोख्या पद्धतीची रचना असलेल्या या थिएटरची ही वास्तू ऐतिहासिक काळातील नाटक, कलाकार आणि संगीत मैफिलींचा, तसेच पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते लता मंगेशकरपर्यंतच्या कलाकारांनी सादर केलेल्या कलेची साक्षीदार राहिली आहे.
मामि फेस्टिव्हल म्हणजे सिनेमा, संस्कृती आणि कला, या वैशिष्ट्यांची नाळ देखील 'ऑपेरा हाऊस' थिएटरशी जोडली गेली आहे. याच पार्श्वभूमीवर मामि फेस्टिव्हलच्या निमित्ताने ऐतिहासिक वारसा लाभलेली ही वास्तू पुन्हा प्रेक्षकांसाठी खुली करण्यात येणार आहे, असे मामि फेस्टिव्हलची क्रिएटीव्ह डायरेक्टर स्मृती किरण यांनी सांगितले आहे. ऑपेरा हाऊस प्रेक्षकांसाठी खुले केल्यानंतर शुक्रवारी याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
1908 साली, कोलकात्याचा कलाकार मोराइस बॅन्डमन याने ऑपेरा हाऊस साकारण्याची कल्पना सत्यात उतरवली. स्वातंत्र्यानंतर 1952 साली, गोंदालचे महाराज विक्रमसिंह यांनी ऑपेरा हाऊस विकत घेतले. आजपर्यंत अनेक दिग्गजांच्या उत्कृष्ट कला या वास्तूने रसिकांना दाखवल्या आहेत, त्या कलांनी रसिकांची वाहवादेखील लुटली आहे. मात्र यानंतर सिंगल स्क्रीन थिएटर चालवणेच कठीण झाल्याने ही वास्तू बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, ही वास्तू पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खुली करायला हवी, या उद्देशाने 2010 साली, विक्रमसिंह यांचे पुत्र ज्योतिंद्रसिंह यांनी 'ऑपेरा हाऊस'ची पुनःस्थापना करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर पुर्नबांधणीची आखणीदेखील करण्यात आली.
ऑपेरा हाऊसचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी वास्तुविशारद आभा लांबा यांच्या नेतृत्वाखाली सहा वास्तुविशारदांच्या पथकाने गेली आठ वर्ष मेहनत घेतली. त्यांनी या ऐतिहासिक वास्तूला नवे रुप मिळवून दिले असून ही वास्तू आता रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'माझ्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण होता, अथक मेहनतीनंतर ही वास्तू उभी राहिली आहे, हा क्षण माझ्यमासाठी आनंदाचा, समाधानाचा आहे',अशी प्रतिक्रिया लांबा यांनी दिली.
या वास्तूची पुर्नबांधणी करताना, दिल्लीतील बिकानेर हाऊस, मुंबईतील ऐतिहासिक ग्रंथालय, अजंठा लेणी, बोध गयासारख्या भारतीय-ब्रिटीश कालीन ऐतिहासिक वास्तूंवरील शिल्पकलेचा अभ्यास करण्यात आला, तसेच या कलांची सांगड घालण्याचा प्रयत्न केल्याचेही लांबा यांनी सांगितले आहे. आठ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर ऑपेरा हाऊसने कात टाकली आहे. आता ऐतिहासिक थिएटर नवे सौंदर्य पाहण्यासाठी मुंबईकरदेखील तितकेच उत्सुक आहेत.