आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेत अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिने साकारली आहे. तिला या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान अश्विनीचा भाऊ बद्री हा सातारा येथील पसरणी गावाचा उपसरपंच झालाय. त्यामुळे अश्विनीने सोशल मीडियावर तिचा आनंद व्यक्त केला आहे. या निमित्ताने तिने तिचा भाऊ बद्री ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला होता तेव्हाचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी तिने राजकारणाबद्दलचंही मत व्यक्त केले आहे.
अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर जुने फोटो शेअर करत लिहिले की, आज आठवणींना थोडा उजाळा....बद्री ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला त्या दिवशी हा फोटो काढला होता. राजकारणाचे धडे गिरवायचे तर सुरुवात होते ती याच निवडणुकीपासून. नाना कायम म्हणायचे विरोध हा फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित ठेवावा. कारण निवडून आलेला माणूस हा सगळ्यांचा असतो, जे मत देत नाहीत त्यांचाही.
अश्विनीचा भाऊ बद्री उपसरपंच झाल्याबद्दल मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अश्विनी सध्या आई कुठे काय करते या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेशिवाय तिने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. तसेच ती महाराष्ट्र शाहीर, बॉईज या सिनेमात झळकली आहे.