Oscars 2023 : सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा दोन दिवसांपूर्वी दिमाखात पार पडला. यंदा भारताने दोन पुरस्कार पटकावले. 'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) या लघुपटाला पहिला पुरस्कार मिळाला तर 'आरआरआर' (RRR) सिनेमातील 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्याला दुसरा पुरस्कार मिळाला. सोहळ्यात काही कलाकारांनी 'नाटू नाटू' गाण्यावर डान्स परफॉर्मन्सही केला. तर नाटू नाचू चे गायक कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी व्यासपीठावर स्वत: गाणं गायलं. मात्र अभिनेते रामचरण (Ramcharan) आणि ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) यांनीच का डान्स परफॉर्म केला नाही असा प्रश्न सर्वच भारतीयांना पडला असणार.
ऑस्कर २०२३ पुरस्कार सोहळ्यात 'आरआरआर'च्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. त्यांच्यासमोर 'नाटू नाटू' गाण्यावर काही कलाकारांनी परफॉर्मन्स दिला. ज्युनिअर एनटीआर आणि रामचरणची गाण्यातील ती आयकॉनिक स्टेप बघण्यासाठी सर्वच उत्सुक होते. मात्र दोघांनी डान्स का केला नाही याचं उत्तर ऑस्कर २३ चे निर्माते राज कपूर यांनी दिलं आहे. ते म्हणाले, 'गायक कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांच्यासह ज्युनिअर एनटीआर, रामचरणला परफॉर्म करायचं होतं. त्यांच्या व्हिसाचीही व्यवस्था झाली होती. फेब्रुवारी महिन्याअखेरीस त्यांनी तशी माहितीही देण्यात आली होती, पण लाईव्ह परफॉर्मन्स देण्यात दोघंही कम्फर्टेबल नव्हते. त्यांचे शेड्युल बिझी होते त्यामुळे प्रॅक्टीससाठी वेळ मिळणार नव्हता. म्हणूनच त्यांनी नकार दिला.'
ते पुढे म्हणाले, 'नाटू नाटू या मूळ गाण्याची रिहर्सल करण्यासाठी दोन महिन्यांचं वर्कशॉप घेण्यात आलं होतं. तर १५ दिवसांपेक्षा जास्त काळात ते शूट झालं होतं. ऑस्करमधील नाटू नाटू च्या परफॉर्मन्ससाठी डान्सर्सनी १८ तास आणि ९० मिनिटे कॅमेरा ब्लॉक सेशन घेण्यात आलं होतं.'
यंदाचा ऑस्कर सोहळा भारतीयांसाठी खास ठरला. तसेच भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोणही पुरस्कार सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून उपस्थित होती. या सोहळ्याकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं होतं. अखेर तो क्षण आलाच जेव्हा 'द एलिफंट व्हिस्परर्स' ला पहिला पुरस्कार जाहीर झाला आणि नंतर 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉंग चा पुरस्कार मिळाला.