96th Academy Awards : मनोरंजनविश्वातील प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा ऑस्कर सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना हा पुरस्कार दिला जातो. यंदा ९६व्या अकादमी पुरस्कार कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला कलाविश्वातील दिग्गज आणि सेलिब्रिटी उपस्थित असतात. ऑस्कर सोहळ्यातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
यंदाच्या ऑस्कर २०२४ साठी भारताच्या 'टू किल अ टायगर' या डॉक्युमेंट्री सिनेमाला नामांकन मिळालं होतं. दिग्दर्शिका निशा पहुजा यांची डॉक्युमेंट्री असलेला एकमेव भारतीय सिनेमा यंदाच्या ऑस्कर शर्यतीत होता. पण, हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सिनेमाला मागे टाकत 20 Days in Mariupol या सिनेमाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म या पुरस्कारावर नाव कोरलं. त्यामुळे यंदा एकही भारतीय सिनेमाला ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरता आलेलं नाही.
गेल्या वर्षी ९५व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात राजामौली यांच्या RRR सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग हा पुरस्कार मिळाला होता. त्याबरोबरच 'द एलिफंट व्हिस्पर्स' या शॉर्ट फिल्मलाही ऑस्कर मिळाला होता. पण, यंदाच्या ऑस्करमध्ये मात्र एकाही भारतीय सिनेमाला ऑस्कर पटकावता आला नाही.