Join us

Oscar 2024 : नितीन देसाई यांना ऑस्कर सोहळ्यात मानवंदना; कलाविश्वातील योगदानासाठी कलाकारांकडून आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 10:39 AM

96th Academy Awards : ऑस्कर २०२४च्या सोहळ्यात मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना आदरांजली देण्यात आली.

96th Academy Awards : मनोरंजनविश्वातील प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा  ऑस्कर सोहळा कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना हा पुरस्कार दिला जातो. ९६व्या अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एकाही भारतीय सिनेमाला अवॉर्ड मिळाला नाही. पण, तरीही या अवॉर्ड सोहळ्याने भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

ऑस्कर २०२४च्या सोहळ्यात मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना आदरांजली देण्यात आली. दरवर्षी अकादमी पुरस्कार सोहळ्यात 'मेमोरियम' या सत्रात कलाविश्वात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिवंगत कलावंतांना स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनाही कलाविश्वातील योगदानासाठी मानवंदना देण्यात आली. नितीन सरदेसाई यांच्याबरोबरच फ्रेंड्स स्टार मॅथ्यू पेरी, अभिनेत्री चिता रिवेरा, अभिनेता रयान, कॉमेडियन रिचर्ड लेविस, टिना टर्नर आणि इतर कलाकारांना स्मरून आदरांजली वाहण्यात आली. 

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट २०२३ रोजी एनडी स्टुडिओत आत्महत्या करत जीवन संपवलं होतं. 'लगान', 'स्लमडॉग मिलेनियर', 'हम दिल दे चुके सनम', 'बाजीराव मस्तानी', 'देवदास' यांसारख्या सुपरहिच सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. त्यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. नितीन देसाईंचं कलादिग्दर्शन असलेल्या लगान या सिनेमाला २००२ साली सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाच्या कॅटेगरीत नामांकन मिळालं होतं. 

दरम्यान, यंदाच्या ऑस्करमध्ये ओपनहायमर, बार्बी आणि पुअर थिंग्ज या सिनेमाला सर्वाधिक नामांकन होती. ऑस्कर २०२४मध्ये ओपनहायमर हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. तर किलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. ओपनहायमरचे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारावर नाव कोरलं. तर यंदाच्या ऑस्करमध्ये इमा स्टोन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. 'पुअर थिंग्ज'मधील अभिनयासाठी इमा स्टोनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

टॅग्स :ऑस्करनितीन चंद्रकांत देसाईसिनेमा