मनोरंजनविश्वातील प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा ऑस्कर सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना हा पुरस्कार दिला जातो. यंदा ९६व्या अकादमी पुरस्कार कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला कलाविश्वातील दिग्गज आणि सेलिब्रिटी उपस्थित असतात. ऑस्कर सोहळ्यातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ९६व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात दा'वाइन जॉय रँडॉल्फ हिने सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री या पुरस्कारावर नाव कोरलं. 'द होल्डओव्हर्स' या सिनेमासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर पुरस्कार घोषित होताच अभिनेत्री भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. पुरस्कार स्विकारल्यानंतर दा'वाइन जॉय रँडॉल्फ ऑस्करच्या मंचावरच रडू लागली.
यंदाच्या सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता पुरस्कारावर रॉबर्ट डाउनी ज्युनियर याने नाव कोरलं. 'ओपनहायमर'मधील भूमिकेसाठी रॉबर्ट डाउनी जुनिअरला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रॉबर्ट डाउनीला मिळालेला हा पहिलाच ऑस्कर आहे.
दरम्यान, यंदाच्या ऑस्कर २०२४ मध्ये २३ श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहेत. भारताची 'टू किल अ टायगर' हा डॉक्युमेंट्री सिनेमाही यंदा ऑस्करच्या शर्यतीत आहे. दिग्दर्शिका निशा पहुजा यांनी ही डॉक्युमेंट्री फिल्म दिग्दर्शित केली आहे.