Join us

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबिन विल्यम्स यांचे निधन

By admin | Published: August 12, 2014 9:08 AM

विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ऑस्कर विजेते अभिनेते रॉबिन विल्यम्स यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन टीम
लॉस एंजलिस, दि. १२ -  विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ऑस्कर विजेते अभिनेते रॉबिन विल्यम्स यांनी सोमवारी आयुष्याच्या रंगमंचावरुन कायमची 'एक्झिट' घेतली. सोमवारी रात्री विल्यम्स यांचा मृतदेह कॅलिफोर्नियातील राहत्या घरी आढळला असून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. ते ६३ वर्षांचे होते. गुड विल हंटींग, नाईट अ‍ॅट म्यूझियम - दि सिक्रेट ऑफ टॉम्ब, जूमांजी, डेड पोएट सोसायटी या चित्रपटांमधील अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांवर छाप पाडली होती. 
उत्तर कॅलिफोर्नियातील टिबूरॉन येथील निवासस्थानी रॉबिन विल्यम्स हे बेशुद्धावस्थेत असल्याचा फोन अमेरिकेतील आपतकालीन यंत्रणेला आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता रॉबिन यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. रॉबिन यांना दारुचे व्यसन होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते अशी माहिती त्यांच्या प्रसिद्धी प्रमुखाने दिली. विल्यम्स यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
रॉबिन यांच्या अकाली निधनावर प्रतिक्रिया देताना त्यांची पत्नी सुझेन स्नायडर म्हणाल्या, रॉबिनच्या निधनाने मला मोठा मानसिक धक्का बसला आहे. चांगला मित्र आणि पती मी गमावला. हॉलिवूडसह जगभरातून रॉबिन यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही विल्यम्स यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 
१९५१ मध्ये शिकागोत जन्मलेले रॉबिन विल्यम्स यांनी शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. न्यूयॉर्कमधील एका ख्यातनाम शाळेतून त्यांनी कलेचे शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना विल्यम्स यांनी हास्य कलाकार म्हणून काम करावे असा सल्ला शाळेतील एका शिक्षकाने दिला आणि यानंतर विल्यम्स यांनी विनोदी नट म्हणून काम करायला सुरुवात केली. १९७० मध्ये मॉर्क अँड मिंडी या मालिकेतून पदार्पण केले. गुड मॉर्निंग व्हिएतनाम (१९८७), डेड पोएट सोसायटी (१९८९) आणि फिशर किंग (१९९१) या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. तर १९९७ मध्ये प्रदर्शित झालेली गुडविल हंटींग या चित्रपटासाठी त्यांना ऑस्करमध्ये सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. जुमांजी, पॉपोय, अलादीन या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते.