'ऑस्कर' विनिंग फिल्म 'पॅरासाईट' (Parasite) मधील साऊथ कोरियन अभिनेता ली-सुन-क्युन (Lee Sun Kyun) याचा मृत्यू झाला आहे. २७ डिसेंबर रोजी सियोल येथील एका पार्कमध्ये गाडीत अभिनेता मृतावस्थेत आढळला. त्याचं वय 48 वर्ष होतं. त्याच्या मृत्यूमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. तर अभिनेता घरातून निघाल्यावर त्याच्या पत्नीला एक चिठ्ठीही मिळाली होती. त्याने आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र पुढील तपास केला जाणार आहे.
'पॅरासाईट' मध्ये श्रीमंत वडिलांच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता ली-सुन-क्युनला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. अनेक कोरियन सिनेमांमध्ये त्याने भूमिका साकारली आहे. काही महिन्यांपासून त्याच्याविरोधात अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी चौकशी सुरु होती. चुकून नाईटक्लब मध्ये ड्रग्स सेवन केल्याचं त्याने सांगितलं होतं. तसंच मी ते स्ट्रॉ ने घेतलं होतं ते ड्रग्स आहेत हे माहितच नव्हतं असंही तो पोलिसांना म्हणाला होता. Reuters नुसार, ली-सुन-क्युन एका पार्कमध्ये आपल्या गाडीत बेशुद्धावस्थेत सापडला. Yonhap न्यूज एजन्सीनुसार, लीच्या पत्नीला मिळालेली चिठ्ठी सुसाईड नोट असल्यासारखी वाटली. म्हणून तिने लगेच पोलिसांना संपर्क केला. अभिनेत्याने आत्महत्या केल्याचंच प्रथमदर्शनी निदर्शनास आलं आहे. मात्र अद्याप पुढील तपास सुरु असल्याने काही स्पष्ट सांगता येणार नाही असंही पोलिस म्हणाले.
सोशल मीडियावर चाहते शोक व्यक्त करत आहेत. अनेक कोरियन सेलिब्रिटींनीही श्रद्धांजली वाहिली आहे. ली-सुन-क्युनने 'हेल्पलेस','ऑल अबाऊट माय वाइफ','माय मिस्टर','अ हार्ड डे' सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे.