'टायटॅनिक' (Titanic) आणि 'अवतार' (Avatar) या ब्लॉकबस्टर सिनेमांचे निर्माते जॉन लँडाऊ ( Jon Landau Passes Away) यांचं वयाच्या 63 व्या वर्षी निधन झालं. त्यांची मुलगी जेमी लँडाऊने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जॉन लँडाऊ यांच्या निधनाने हॉलिवूडवर शोककळा पसरली असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. जॉन लँडाऊ गेल्या काही काळापासून कॅन्सर या आजराशी झुंज देत होते.
जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा निर्माते म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. टायटॅनिक आणि अवतार सिनेमांची निर्मिती त्यांनी केली आहे. अवतार 2 हा सिक्वेल बनवण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रसिद्ध हॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन आणि जॉन लँडाऊ हे दिर्घकाळ सहकारी राहिले आहेत. दोघे एक प्रोडक्शन कंपनी चालवत होते. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. या जोडीने आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्वाधिक कमाई करणारे चार चित्रपट दिले आहेत.
जॉन लँडाऊने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. जॉन लँडाऊने जेम्स कॅमेरॉन सोबत 1997 मध्ये टायटॅनिक हा चित्रपट बनवला, जो जगभरातील बॉक्स ऑफिसच्या इतिहासात 1 अब्ज डॉलर्स कमावणारा पहिला चित्रपट ठरला होता. याशिवाय 2009 मध्ये त्यांनी अवतार हा चित्रपट बनवला. सध्या हा चित्रपट जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. आजपर्यंत जगातील कोणत्याही चित्रपटाने 'अवतार'पेक्षा जास्त कमाई केलेली नाही.
'टायटॅनिक' हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आता चौथ्या क्रमांकावर आहे. 2009 साली प्रदर्शित झालेला 'अवतार' हा सिनेमा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. तर 2022 चा सिक्वेल 'अवतार: द वे ऑफ वॉटर' तिसऱ्या क्रमांकावर आहे. 'टायटॅनिक' हा जगभरात $1 बिलियनपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला चित्रपट आहे. तर Avengers: Endgame दुसऱ्या क्रमांकावर आहे.