लॉस एंजिलिस : चित्रपट निर्माते क्लो झाओ यांच्या नोमॅडलँड या चित्रपटाला ९३व्या पुरस्कारात सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. झाओ या आशियातील अशा पहिल्या महिला आहेत, ज्यांनी सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार मिळविला आहे.चित्रपटाच्या मुख्य कलाकार फ्रान्सिस मॅकडोरमंड यांनी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे. कॅथरीन बिगेलो या पहिल्या महिला होत्या ज्यांनी २०१० मध्ये द हर्ट लॉकर या चित्रपटासाठी ऑस्कर जिंकले होते.
गतवर्षी साथीच्या रोगामुळे थिएटर रिकामे पडलेले आहेत. त्याची आठवण काढत कलाकार मॅकडोरमंड यांनी म्हटले आहे की, आम्ही थिएटरच्या अंधारात चित्रपटाचा आनंद घेत असू तो दिवस लवकरच येईल. या अभिनेत्रीने झाओ यांच्यासोबत चित्रपटाची निर्मितीही केली आहे. झाओ (३९) या किशोरावस्थेत अमेरिकेत आल्या होत्या.
नोमॅडलॅंड हा झाओ यांचा तिसरा चित्रपट आहे. जेसिका बर्डर यांच्या पुस्तकावर आधारित या चित्रपटात फ्रान्सिस मॅकडोरमंडने फर्नची भूमिका केली आहे. ही एक अशी महिला आहे जी कंपनीची आर्थिक स्थिती खराब झाल्यानंतर आपल्या व्हॅनसोबत पारंपरिक समाजाच्या बाहेर नवे आयुष्य शोधत आहे. प्रसिद्ध हॉलीवूड कलाकार अँथनी हॉपकिन्सने द फादरमधील आपल्या भूमिकेसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे.
ऑस्कर सोहळ्यात भारताच्या वाट्याला एक भावुक क्षण; इरफान, भानू यांना श्रद्धांजली
ऑस्करच्या रंगलेल्या शानदार सोहळ्यात अनेक बदल पाहायला मिळाले. सर्वप्रथम कोरोनामुळे हा सोहळा काहीसा विलंबाने पार पडला. विशेष म्हणजे, यंदाच्या या सोहळ्यात ना होस्ट होता, ना प्रेक्षक. डॉल्बी थिएटरमध्ये रंगलेल्या या सोहळ्यात भारताच्या वाट्याला काय आले तर एक भावुक क्षण. बॉलिवूड अभिनेता दिवंगत इरफान खान आणि ऑस्कर विजेत्या प्रख्यात वेशभूषाकार दिवंगत भानू अथय्या यांना या सोहळ्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा क्षण तमाम भारतीय प्रेक्षकांना भावुक करणारा ठरला.
ऑस्कर्स इन मेमोरियम सेक्शनमध्ये इरफानचा उल्लेख करण्यात आला. अभिनय क्षेत्रातील त्याच्या अपूर्व कामगिरीचे कौतुक करत, त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. इरफानशिवाय, सिसली टायसन, क्रिस्टोफर प्लमर आणि चॅडविक बोसमेन यांनाही श्रद्धांजली वाहिली गेली. इरफान याने स्लमडॉग मिलेनिअर आणि अनेक बॉलिवूड, हॉलिवूड चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.