सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९४ व्या ऑस्कर (oscars 2022) पुरस्कारासाठीचे नामांकन आज जाहीर करण्यात येत आहे. संध्याकाळी ७ वाजल्यापासून लाईव्ह स्ट्रीमद्वारे या पुरस्कार सोहळ्याची घोषणा केली जात असून पुरस्काराच्या नामांकनांची घोषणा ट्रेसी एलिस रॉस आणि लेस्ली जॉर्डन हे करत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये 'रायटिंग विथ फायर' या भारतीय डॉक्युमेंट्रीला नामांकन मिळालं आहे.
सध्या ऑस्करच्या नामांकनाची घोषणा ऑस्करच्या अधिकृत वेबसाईट Oscars.org, ABC, YouTube, Twitter आणि Facebook याद्वारे करण्यात येत आहे. यावेळी ट्रेसी आणि लेस्ली यांनी रायटिंग विथ फायर या डॉक्युमेंट्रीला नामांकन मिळाल्याचं जाहीर केलं.
दरम्यान, जगभरातील २७६ चित्रपट ‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी खुल्या विभागात स्पर्धेत असून यात भारतातील तीन चित्रपटांचा समावेश आहे. यात टी. जे. ज्ञानवेल दिग्दर्शित 'जय भीम' आणि मोहनलाल यांचा 'मराक्कर' हे चित्रपटदेखील सहभागी झाले आहेत. तसंच 'इंडिया स्वीट अँड स्पायसेस' हा देखील चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आहे.