साऊथच्या फिल्मी चाहत्यांचे क्रेज आपल्याला ठाऊक आहेच. आपल्या आवडत्या स्टारचा चित्रपट रिलीज झाला रे झाला की, चाहत्यांमध्ये त्या स्टारच्या कटआऊटला दूधाचा अभिषेक (पाल अभिषेकम)घालण्याची अहमिका लागते, ते त्याचमुळे. या सगळ्यांत दूधाची नासाडी होतेय, हे या चाहत्यांच्या गावीही नसते. तामिळनाडू मिल्क डीलर्स वेलफेअर असोसिएशनला मात्र दूधाची ही नासाडी पाहावत नाही. चाहत्यांना अशी नासाडी थांबवायला सांगा, अशी विनंती अनेकदा या असोसिएशनने साऊथ स्टार्सला केली. पण ना स्टार्सवर (काही अपवाद वगळता) याचा परिणाम झाला, ना चाहत्यांवर. त्यामुळे दूधाची ही नासाडी रोखण्यासाठी असोसिएशनने आता थेट पोलिसांत धाव घेतली आहे.
होय, सुपरस्टार्सच्या फिल्म रिलीजदरम्यान अनेक लोक दुकानांतून दूधाचे पॅकेट चोरी करतात. या चोरीमुळे आम्हाला नाहक नुकसान सोसावे लागते, असा असोसिएशनचा आरोप आहे. त्यामुळे राज्यात फिल्म स्टार्सच्या पोस्टर्सवर होणाºया दूधाच्या अभिषेकावर बंदी लादून दूधाची नासाडी थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी या असोसिएशनची मागणी आहे. सुपरस्टार्सच्या रिलीजवेळी दूधांच्या दुकानांना पोलिस सुरक्षा पुरवण्याची मागणीही असोसिएशनने केली आहे.
असोसिएशनचे अध्यक्षांनी सांगितल्यानुसार, २०१५ पासून त्यांची ही मागणी आहे. यासंदर्भात त्यांनी रजनीकांत, अजीत, विजय अशा अनेक सुपरस्टार्सशी चर्चाही केली. मात्र याऊपरही हे सगळे थांबलेले नाही.
कमल हासन व सिवकार्थिकेयन यासारख्या साऊथ सुपरस्टार्सनी मध्यंतरी दूधाची नासाडी करू नका, असे आवाहन चाहत्यांना केले होते. तूर्तास सुपरस्टार सिंबू याकामी पुढाकार घेतला आहे. माझ्या पोस्टर्सवर दूधाचा अभिषेक घालून दूधाची नासाडी करू नका, असे आवाहन त्याने केले आहे. आता या आवाहनाचा चाहत्यांवर किती परिणाम होतो, ते बघूच.