Join us

"हा खूप महत्वाचा विषय असल्याने..."; 'पाणी' मधील अभिनेत्रीने सांगितला शूटिंगचा खास अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 1:23 PM

'पाणी' चित्रपटातील अभिनेत्री ऋचा वैद्यने पहिल्या सिनेमात काम करण्याचा अनुभव शेअर केलाय (paani, adinath kothare)

प्रियांका चोप्रा जोनास आणि राजश्री एंटरटेनमेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्सचा नवा चित्रपट 'पाणी' १८ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रातील पाणीटंचाई या महत्त्वाच्या विषयाचा वेध घेणाऱ्या 'पाणी' या आगामी मराठी चित्रपटासाची सर्वांना उत्सुकता आहे. मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या तरुणाच्या संघर्ष चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून अभिनेत्री ऋचा वैद्य मराठी चित्रपटविश्वात पदार्पण करतेय. पहिल्याच चित्रपटात काम करण्याचा अनुभव ऋचाने सांगितलाय.

ऋचाचा 'पाणी'मध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ऋचा म्हणाली, "माझा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. पहिली गोष्ट कायमच विशेष असते. त्यामुळे माझ्यासाठी हा चित्रपट खूप खास आहे. इतका महत्वाचा आणि ज्वलंत विषय असल्याने या चित्रपटाचा भाग होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हनुमंत केंद्रे यांनी गावात कसं पाणी आणलं ही चित्रपटाची गोष्ट आहे. या चित्रपटात खूप छान लव्हस्टोरी दडलेली आहे."

ऋचा पुढे म्हणाली, "जेव्हा एखादा माणूस प्रेमासाठी किंवा प्रेमापोटी एखादी गोष्ट करतो ना तेव्हा ती गोष्ट खूप सुंदर आणि मॅजिकल होते. आदिनाथसोबत काम करताना खूप मजा आली. तो माझा चित्रपटातला पहिला सहकलाकार आहे. तो एक उत्कृष्ट दिग्दर्शकही आहे. माझी भूमिका साकारण्यासाठी त्याने दिग्दर्शक आणि सहकलाकार म्हणून मला खूप पाठिंबा दिलाय. त्यामुळे माझ्यासाठी हा प्रवास खूप सुंदर होता."

'पाणी' चित्रपटाची सध्या खूप चर्चा असून यामध्ये आदिनाथ कोठारे, ऋचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील आणि इतर कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनास आणि डॉ मधु चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  महेश कोठारे आणि सिद्धार्थ चोप्रा हे या प्रकल्पाचे सहयोगी निर्माते आहेत.

 

टॅग्स :आदिनाथ कोठारेसुबोध भावे