Ashwini Kulkarni: 'पछाडलेला' या सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी कुलकर्णी. हा चित्रपट त्याकाळी चांगलाच गाजला होता. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, श्रेयस तळपदे, भरत जाधव यांची पछाडलेला मध्ये मुख्य भूमिका होती. दरम्यान, या चित्रपटात दुर्गा मावशीची लेक म्हणजेच मनिषा या पात्राला विशेष पसंती मिळाली होती. अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने या चित्रपटात मनिषाची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. सध्या ही अभिनेत्री तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मराठी सिने-इंडस्ट्रीविषयी भाष्य केलं आहे.
अलिकडेच अभिनेत्री अश्विनी कुलकर्णीने 'द पोस्टमन' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान, अभिनेत्रीला बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीच्या तुलनेत मराठी सिनेमा सध्या कुठे आहे आणि काय करतोय? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अभिनेत्रीने सांगितलं, "खरं सांगू का? बॉलिवूड असो किंवा साऊथ इंडस्ट्री असो त्यांची बजेट्स आणि त्यांचे प्रेक्षक हे मराठी सिनेमाच्या खूप पटीत आहेत. म्हणजे मराठी सिनेमाचं बजेट आणि प्रेक्षक हे त्याच्या खूप कमी प्रमाणात आहेत. एखादा तेलुगू सिनेमा बनत असेल तर तमीळ तेलुगू बाकीची सगळी जी साऊथ इंडियन इंडस्ट्री आहे. ती फक्त त्या भाषेतील सिनेमे बघते. म्हणजे ते हिंदी सिनेमे बघतीलच असे नाही."
पुढे अभिनेत्री म्हणाली, "हेच मराठी सिनेमांच्या बाबतीत दुर्भाग्य आहे की मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपट बघत नाही. मराठी प्रेक्षकच इतका विभागला गेला की साऊथ इंडियन चित्रपट बघणारा, हिंदी चित्रपट बघणारा आणि उरला-सुरला मराठी चित्रपट बघणारा असा प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. त्यामुळे जर तुलना करायची झाली तर सगळ्याच बाबतीत म्हणजेच बजेट आणि प्रेक्षकांच्या बाबतीत मराठी सिनेमा बऱ्याच प्रमाणात मागे आहे. पण, जर कंटेंटच्या दृष्टीने पाहिलं तर मराठीमध्ये कंटेंट फार आहे.