राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक सुरेश वाडकर त्यांच्या गायकीने नेहमीच श्रोत्यांना थक्क करतात. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक गाण्यांना आवाज देत सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे.
आजपर्यंत सुरेश वाडकर यांना गायनासाठी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. त्यांच्या योगदानाची दखल घेत आज सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारत सरकारच्या मानाच्या समजल्या जाणा-या पद्मश्री पुरस्काराची घोषणा होताच वाडकर यांनी या पुरस्काराचे श्रेय त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या गुरू यांना दिला आहे. माझ्या या यशात चाहत्यांचाही मोठा वाटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ही बातमी कळताच सर्वच स्थरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.