Join us

पद्मिनी कोल्हापुरे यांनी इंडियन आयडॉल १२ मधील मराठमोळ्या सायलीला दिले स्पेशल गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 17:36 IST

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेंनी नुकतीच इंडियन आयडॉलमध्ये हजेरी लावली होती.

संगीत क्षेत्राला ज्या कार्यक्रमाने अनेक गायक दिले आहेत, तो कार्यक्रम देशासाठी आणखी एक आयडॉल देण्यासाठी सज्ज आहे. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल हा सर्व नवोदित गायकांसाठीचा प्लॅटफॉर्म असून तेथे ते त्यांची प्रतिभेचे सादरीकरण करू शकतात. पूर्वीच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि पून धिल्लों या यंदाच्या विकेंड एपिसोडच्या पाहुण्या होत्या. त्यामुळे हा भाग अतिशय संस्मरणीय ठरला.

अवघ्या देशवासियांची मनं जिकणारी, गोड आवाजाची मराठी मुलगी सायलीने सुमधूर आवाजात प्यार किया नही जाता आणि ये वादा रहा ही गाणी गायली. पद्मिनी कोल्हापुरेंमध्ये तिला नवा चाहता गवसला. सुवर्ण युगातील बहारदार अभिनेत्रीने तिला सायलीचे गाणे प्रचंड आवडल्याचे सांगितले तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तिला आशीर्वाद म्हणून त्यांनी मराठमोळी नथ आणि बिंदीही भेट म्हणून दिली. तिच्या परफॉर्मन्सचे कौतुक करण्यास परीक्षकही रोखू शकले नाहीत. त्यांनी तिला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हिमेश रेशमिया म्हणाले, ‘तुझी सुरांवर घट्ट पकड आहे’. सायली तिची प्रतिक्रिया देताना म्हणाली, ‘एवढ्या महान व्यक्तींसमोर गाणे गाण्याची संधी इंडियन आयडॉलमुळे मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते. पद्मिनी मॅमकडून हे विशेष गिफ्ट मिळणे म्हणजे एखादा आशीर्वाद मिळाल्यासारखेच आहे. माझ्यावर तसेच माझ्या गाण्यावर विश्वास ठेवणाऱ्या कुणालाही मी निराश करणार नाही.” 

पद्मिनी म्हणाल्या, “मला तुझा परफॉर्मन्स आणि आवाज खूप आवडला. तुझी स्माइलही छान आहे. मी तुला भेट म्हणून देत असलेल्या नथीला माझ्या मनात विशेष महत्त्व आहे. मी तिची जशी काळजी घेत होते, तशीच तू घेशील, असा मला विश्वास आहे.”

इंडियन आयडॉल, दर शनिवार व रविवारी रात्री ८ वाजता, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळेल.

टॅग्स :इंडियन आयडॉलपद्मिनी कोल्हापुरे