आशुतोष गोवारिकरच्यापानिपत या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष करणार असून पानिपतच्या युद्धावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. आता या चित्रपटाच्या कास्टमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीत आपले प्रस्थ निर्माण करणाऱ्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे पानिपत या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पानिपत या चित्रपटात पद्मिनी गोपिका बाई ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. हा चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
पद्मिनी कोल्हापूरे ही हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री आहे. 'प्रेम रोग','आहिस्ता आहिस्ता','वो सात दिन','विधाता' अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे ऐंशीच्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती. मात्र पद्मिनी कोल्हारपूरे या अभिनयाच्या क्षेत्रात अपघातानेच आल्या. आपल्या आत्या लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याप्रमाणे गायिका बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. फक्त नशीब आजमावण्यासाठी त्या सिनेमात आल्या होत्या. मात्र नंतरच्या काळात सिनेमा आणि अभिनयच त्यांचं जणू आयुष्य बनलं. 'इश्क इश्क इश्क’ आणि ‘सत्यम शिवम सुंदरम या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय केला. वयाच्या 15व्या वर्षी 'इंसाफ का तराजू' या सिनेमासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. यानंतर पद्मिनी कोल्हापूरे अभिनय आणि सिनेमात रमल्या. विविध सिनेमात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या.
पद्मिनी इंडस्ट्रीत बालकलाकार म्हणून पाऊल ठेवले होते. ‘यादों की बारात’ चित्रपटात कोरसमध्ये (ग्रुप) गीत गायिले होते. पद्मिनीचा यांचा जन्म १ नोव्हेंबर १९६५ मध्ये झाला. त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा तिचा चेहरा खूपच नाजूक होता. त्यामुळे दिग्दर्शकांनी तिला बालकलाकार म्हणून संधी दिली होती.