पद्मिनी कोल्हापूरे ही हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. 'प्रेम रोग', 'आहिस्ता आहिस्ता', 'वो सात दिन', 'विधाता' अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे ऐंशीच्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
सब कुशल मंगल या चित्रपटाद्वारे प्रियांक शर्मा बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला त्याने नुकतीच सुरुवात केली आहे. प्रियांकसोबत या चित्रपटात रिवा किशन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे रिवा ही बॉलिवूडचा अभिनेता रवी किशनची मुलगी आहे.
सब कुशल मंगल या चित्रपटाची निर्मिती प्राची मनमोहन सिंग म्हणजेच नितीन मनमोहन सिंग यांची कन्या यांनी केली असून या चित्रपटात अक्षय खन्ना देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन करण विश्वनाथ कश्यप करत आहे. दिग्दर्शन करण्याची करणची ही पहिलीच वेळ आहे.
सब कुशल मंगल या चित्रपटाचा मुर्हूत नुकताच रांची येथे झाला असून यावेळी प्रियांक, रिवा, प्राची मनमोहन सिंग, नितीन मनमोहन सिंग उपस्थित होते. आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी रवी किशनने आपल्या पत्नीसमवेत तर पद्मिनी कोल्हापूरे आणि पती प्रदीप शर्मा यांनी देखील हजेरी लावली होती.
पद्मिनी आपल्या मुलाच्या पदार्पणाविषयी सांगतात, या चित्रपटाची सगळीच टीम अतिशय नवीन असून त्यांच्यात एक वेगळीच एनर्जी आहे. प्रियांक, रिवा, प्राची, करण सगळेच आपल्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. त्यांचा उत्साह त्यांच्या कामात देखील दिसून येणार यात काहीच शंका नाही. या सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.
रवी किशन सांगतो, मला माझ्या मुलीवर गर्व आहे. रिवा कुशल मंगल या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड प्रवासाला सुरुवात करत आहे याचा मला आनंद होत आहे.