कलाकार मंडळी कायम त्यांच्या कामातच बिझी असतात. शुटिंगच्या धबडग्यात त्यांना इतर गोष्टींसाठी किंवा आपल्या कुटुंबीयांना वेळ देणं तितकं शक्य नसतं. मात्र काही जण याला अपवाद असतात. सारं काही सांभाळून हे कलाकार आपल्या कुटुंबाला तितकाच वेळ देतात, शिवाय इतर गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढतात. आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी ते वेळ राखून ठेवतात. या काळात कलाकार आपले छंद आणि आवड जपतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. पद्मिनी यांना चित्रकलेची आवड आहे. त्यांची ही आवड शशांक उदापूरकर दिग्दर्शित आणि ओम छंगानी निर्मित 'प्रवास' या आगामी मराठी सिनेमानेही जोपासली आहे.
बालकलाकाराच्या रूपात सुरू झालेल्या आपल्या कारकिर्दीत पद्मिनी यांनी असंख्य लोकप्रिय हिंदी सिनेमात विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. यात दोन मराठी आणि एका मल्याळम सिनेमाचाही समावेश आहे. याशिवाय एका इंग्रजी भाषिक सिनेमाची निर्मिती करणाऱ्या पद्मिनी 'प्रवास' या मराठी सिनेमात पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात दिसणार आहेत. या सिनेमात अशोक सराफ यांच्यासोबत त्यांची जोडी जमली आहे. पद्मिनी यांना बालपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. 'प्रवास'मध्ये त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखाही चित्रकाराची असल्यानं पडद्यावरही आपली आवड पूर्ण करण्याचं समाधान या भूमिकेनं त्यांना दिलं. या चित्रपटाच्या निमित्ताने भरपूर चित्रं काढता आली. पुन्हा एकदा रंगांबरोबर खेळता आलं. चित्रीकरणादरम्यान मिळणाऱ्या मोकळ्या वेळात मी चित्रकलेची माझी हौस भागवू शकले.
शशांक उदापूरकरने जेव्हा पद्मिनी यांना 'प्रवास'ची कथा ऐकवली, तेव्हा स्टोरी ऐकताना अनाहूतपणे त्यांच्या डोळ्यात कधी पाणी तरळलं ते त्यांनाही समजलं नाही. पद्मिनी कोल्हापूरेंसारखी हुषार अभिनेत्री आणि त्यांच्या जोडीला अशोक सराफांसारखा मराठी सिनेसृष्टीतील अभिनयाचा सम्राट लाभल्यानं 'प्रवास' सिनेमाचा 'प्रवास' खऱ्या अर्थाने सुखकर झाल्याचं शशांक उदापूरकर यांचं म्हणणं आहे. हा 'प्रवास' संगीतमय बनवण्याची जबाबदारी बॅालीवुडचे आघाडीचे संगीतकार सलीम-सुलेमान यांनी पार पाडली आहे.
विक्रम गोखले, रजित कपूर आणि शशांक उदापूरकर आदी कलाकार या प्रवासात पद्मिनी यांचे सहप्रवासी बनले असून, श्रेया घोषाल, सोनू निगम, सुखविंदर सिंग, हरीहरन यांचा सुमधूर सूर या सिनेमातील गीतांना लाभला आहे. गुरू ठाकूर यांनी गीतलेखन केलं आहे, तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचं आहे. डीओपी सुरेश देशमाने यांच्या लेन्समधून अमेरिकेसह मनालीसारख्या नयनरम्य लोकेशन्समधील निसर्गसौंदर्य टिपण्यात आलं आहे. कला दिग्दर्शन महेश साळगांवकर यांनी केलं आहे, तर संकलन संजय सांकला यांचं आहे. ताशीन अन्वारी, दिप्ती सुतार यांनी वेशभूषा केली असून, रंगभूषा श्रीकांत देसाई यांनी केली आहे. 'प्रवास' ३१ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.